नांदेड Nanded Earthquake News : शहरातील काही भागात रविवारी (3 मार्च) भुकंपाचा सौम्य धक्का जाणवला. शहरातील विवेकनगर, श्रीनगर, कैलासनगर, आयटीआय परिसर, शिवाजीनगर, पोलीस कॉलनी या भागात हा सौम्य धक्का जाणवल्याची माहिती आहे. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या भूविज्ञान विभागातील भूकंपमापक यंत्रावर 1.5 रिष्टर स्केल अशी नोंद झाली आहे. दरम्यान, भुकंपाचा धक्का जाणवल्यानं नागरिक घाबरून घराबाहेर पडले होते. यापूर्वीही शहरात अशा प्रकारचे धक्के जाणवले असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण बघायला मिळालं. मात्र, नागरिकांनी घाबरू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय.
1.5 रिश्टर स्केलची नोंद : रविवारी सायंकाळी 6:18 मिनिटांनी नांदेड शहरातील शिवाजी नगर, आय टी आय परिसर, विवेक नगर, श्रीनगर या भागात भूगर्भातून आवाज आल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी नियंत्रण कक्षाला दिली होती. या भुकंपासंदर्भात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. टी. विजयकुमार यांना विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, "भुकंपमापक यंत्रावर या धक्क्यांची नोंद 1.5 रिष्टर स्केल एवढी झालेली आहे. पण यात घाबरण्याचं कारण नाही." तसंच हा अहवाल नियंत्रण कक्षाला कळविण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.