अमरावतीच्या मेळघाटात रंगते 'मिडनाईट होळी' अमरावती Midnight Holi in Melghat : सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या मेळघाटातील आदिवासी बांधवांचा होळी हा सर्वात मोठा सण आहे. सर्वसामान्यपणे होळी ही सायंकाळी पेटवण्याची प्रथा आहे. मात्र, मेळघाटातील उंच पहाडावर वसलेल्या माखला या गावात मध्यरात्री होळी पेटवली जाते.
रात्री अकरा वाजता एकत्र येतात ग्रामस्थ : माखला आणि माखलाढाणा असे एकाच ठिकाणी असणाऱ्या दोन गावाच्या पश्चिम आणि पूर्व दिशेला होळी पेटवली जाते. पूर्व दिशेला पेटणाऱ्या होळीला मोठा मान आहे. ग्रामस्थ आपल्या पारंपारिक वेशात नाचत गात गावातील पोलीस पाटलाच्या घरी जातात. रात्री साडेअकरा वाजता पोलीस पाटील दांपत्य होळी जवळ येतात. पोलीस पाटील दांपत्याच्या हस्ते होळीचं पूजन केल्यावर होळी पेटवली जाते. होळी पेटत असतानाच पारंपारिक वाद्यांवर आदिवासी बांधव लोकगीत नृत्य करतात. माखला गावात रात्री एक वाजेपर्यंत होळीचा हा उत्सव चांगलाच रंगात आला.
रावणाच्या गीताला आहे महत्त्व : होळी पेटवून नाच गाणे असा उत्सव दोन-तीन तासांपर्यंत धुमधडाक्यात चालतो. यानंतर परंपरेनुसार पोलीस पाटील दाम्पत्याला पुन्हा वाजत गाजत त्यांच्या घरी सोडतात. पोलीस पाटलांच्या घरी कुठलंही वाद्य न वाजवता कोरकू भाषेत रावणाचं वर्णन करणारं गीत गायलं जातं. होळीच्या पर्वावर ह्या गाण्याला अतिशय महत्त्व असल्याची माहिती माखला येथील पोलीस पाटील सिम्पली सेलूकर यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.
- होळीच्या निमित्तानं नटून थटून येतात युवक युवती : मेळघाटातील आदिवासी बांधवांचा सर्वात मोठा सण असणाऱ्या होळीच्या पर्वावर युवक आणि युवती नटून थटून होळी पेटवण्यासाठी माखला गावात एकत्र आले होते. आदिवासी परंपरेमध्ये होळीच्या पर्वावर युवक आणि युवती आपल्याला आवडणारा वर आणि वधू निवडून त्याबाबत आपल्या कुटुंबाला माहिती देतात. होळीच्या पर्वावर लग्न जुळवण्याची अतिशय जुनी परंपरा मेळघाटात आहे.
एक नव्हे दोन होळी पेटवण्याची प्रथा : मेळघाटात एक नव्हे तर दोन होळी पेटवड्याची प्रथा आहे. एक होळी ही नर आणि दुसरी मादा अशा स्वरुपात प्रतिकात्मक होळी दहन करण्याची प्रथा संपूर्ण मेळघाटात आहे. विशेष म्हणजे दोन होळीमध्ये पाळणा बांधून त्या पाळणामध्ये लहान बाळाचं प्रतीक म्हणून एक दगड ठेवला जातो. होळीचं पूजन सुरू असताना लहान मुलं हा पाळणा हलवून लहान बाळाप्रमाणे रडण्याचा आवाज काढतात. आदिवासी बांधवांच्या होळी सणात ही अशी प्रथा फार जुनी असल्याची माहिती सेमाडोह येथील येथील रहिवासी ओम तिवारी यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली. तसंच गावात ज्या कुटुंबामध्ये होळीच्या पर्वावर घरातील एखादा सदस्य दगावला असेल, असं कुटुंब गावातील सर्वांसोबत होळीची पूजा करत नाही. होळी शांत झाल्यावर गावातील सर्व लोक आपल्या घरी निघून येतात. त्यानंतर घरात होळीच्या दिवशी कोणी दगावलं तर त्या घरातील सदस्य मध्यरात्री भिजणाऱ्या होळीजवळ येऊन पूजा करतात. अनेक ठिकाणी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत असे काही कुटुंब ढोल वाजवत भजन म्हणतात.
वेगवेगळ्या दिवशी पेटते होळी : मेळघाटातील अनेक भागात होळीच्या दिवशीच होळी पेटत असली तरी होळीपासून पाच दिवस दुर्गम गावातदिवशी बाजार भरतो. त्यादिवशी होळी पेटवण्याची परंपरा आहे. हातरु, कारा, कोठा आणि रायपूर या गावांमध्ये बाजाराच्या दिवशीच होळी पेटवली जाते. मेळघाटात बहुतांश गावात होळीच्या परंपरेत काहीसा बदल दिसून येतो. काटकुंभ, चुरणी, जारीदा या परिसरात होळीच्या तिसऱ्या दिवशी मेघनाथ यात्रा भरते. मेघनाथाच्या पूजेला आदिवासी बांधवांमध्ये फार महत्त्व आहे. माखलासह अनेक गावात रविवारी होळीच्या पर्वावर मेघनाथाची ही पूजा करण्यात आली. ज्या भागात मेघनाथ पूजा असते, त्या ठिकाणी होळीचा आगळावेगळा सोहळा पाहायला मिळतो.
फगवा मागण्याची प्रथा : होळी झाल्यावर तिसऱ्या दिवसापासून मेळघाटात येणाऱ्या बाहेरच्या व्यक्तींकडून फगवा अर्थात पैसे मागण्याची प्रथा आहे. मेळघाटच्या बाहेरुन येणारी वाहनं अडवून वाहनासमोर आदिवासी बांधव नाचून आणि गाणी म्हणून फगवा वागतात. बाहेरुन येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला फगवा द्यावाच लागतो.
हेही वाचा :
- वसंत फुलताना...पानगळीतही फुलांनी बहरला मेळघाट, पर्यटकांना करतोय आकर्षित
- काय सांगता! मेळघाटात चक्क आंब्याच्या झाडाला दाढी; दाढीवाला आंबा अशी खास ओळख