महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, प्रवाशांचे होणार हाल - MEGABLOCK

पश्चिम रेल्वेनेदेखील 12 तासांचा मेगा ब्लॉक जाहीर केलाय. त्यामुळे रविवारी तुम्ही जर आवश्यक कामासाठी बाहेर पडत असाल तर घरातून बाहेर पडण्यापूर्वी रेल्वेचे वेळापत्रक तपासा.

Local megablock
लोकल मेगाब्लॉक (ETV Bharat File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 16, 2024, 12:29 PM IST

मुंबई -उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी 17 नोव्हेंबर 2024 रोजी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर आणि हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर दुसरीकडे पश्चिम रेल्वेनेदेखील 12 तासांचा मेगा ब्लॉक जाहीर केलाय. त्यामुळे रविवारी तुम्ही जर आवश्यक कामासाठी बाहेर पडत असाल तर घरातून बाहेर पडण्यापूर्वी रेल्वेचे वेळापत्रक तपासा.

लोकल १५ मिनिटे उशिराने :मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मुख्य मार्गावरील माटुंगा ते मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गिकेवर सकाळी 11 वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंडदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि मुलुंडपुढे डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. ठाणे येथून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड येथून अप जलद मार्गावर वळविण्यात येतील आणि मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबविल्या जातील आणि माटुंगा स्थानकापासून पुढे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. सदर सेवा आपल्या गंतव्य स्थानावर नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

अप हार्बर मार्गावरील सेवा पूर्णतः रद्द :मध्य रेल्वेने रविवारी हार्बर मार्गिकेवर देखील ब्लॉक घेतला असून, कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे. सीएसएमटी येथून वाशी/बेलापूर/पनवेलकरिता सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सीएसएमटीकरिता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा पूर्णतः रद्द राहतील. प्रवाशांच्या सोयीसाठी ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशीदरम्यान लोकल चालविण्यात येणार आहेत. तसेच हार्बर मार्गावरील प्रवासी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ठाणे ते वाशी-नेरुळ ट्रान्स हार्बर मार्गावरून प्रवास करू शकतात.

12 तासांचा मेगाब्लॉक जाहीर : पश्चिम रेल्वेने मुंबईतील जोगेश्वरी आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान 12 तासांचा मेगाब्लॉक जाहीर केलाय. पूल उभारणी आणि अन्य तांत्रिक आवश्यक कामे करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. जोगेश्वरी आणि गोरेगावदरम्यान पुल क्रमांक 46 च्या गर्डर बसवण्याच्या कामासाठी अप आणि डाऊन दोन्ही धीम्या मार्गांवर तसेच अप आणि डाऊन हार्बर मार्गावर 12 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक आज 16 नोव्हेंबर रोजी रात्री 11:30 ते 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:30 वाजेपर्यंत असेल. परिणामी लोकल आणि मेल/एक्स्प्रेस ट्रेन सेवा प्रभावित होतील, अशा परिस्थितीत या मार्गावरून प्रवास करण्यासाठी इतर मार्गांचा वापर करावा लागू शकतो.

ABOUT THE AUTHOR

...view details