सातारा : माण तालुक्यातील म्हसवडमध्ये उभारण्यात आलेल्या माणदेशी चॅम्पियन्सच्या आधुनिक स्टेडियमचं उद्घाटन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते झालं. साक्षात क्रिकेटचा देव आपल्या भूमीत आल्यानं संपूर्ण माणदेश भारावून गेला. उद्घाटनाच्या कार्यक्रमात नवोदित खेळाडूंनी 'सचिन.. सचिन..'चा जयघोष केला.
सचिन तेंडूलकर सहकुटुंब माणदेशात : माणदेशी फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा चेनता सिन्हा यांनी माण तालुक्यातील म्हसवडच्या मेगा सिटीत आधुनिक स्टेडियम उभारलं आहे. या स्टेडियमच्या उद्घाटनासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला निमंत्रित केलं होतं. या कार्यक्रमासाठी सचिननं पत्नी अंजली आणि मुलगी सारा यांच्यासोबत हजेरी लावली. स्टेडियमच्या उद्घाटनानंतर प्रशिक्षणार्थी खेळाडूंशी त्यानं संवाद साधला. त्याची स्वाक्षरी घेण्यासाठी नवोदित खेळाडूंसह महिला, तरुणींची झुंबड उडाली.
सचिन तेंडुलकरनं मुलगी सारासह अनुभवला रस्सीखेचचा थरार (Source -ETV Bharat Reporter) पारंपरिक पध्दतीनं मास्टर ब्लास्टरचं स्वागत : सचिन तेंडुलकर सहकुटुंब म्हसवडमध्ये दाखल झाल्यानंतर सनई चौघड्याच्या सुरात पारंपरिक पध्दतीनं त्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी सचिननं मुलगी सारासह लहान मुलांसोबत रस्सीखेच खेळात भाग घेतला. या खेळात शेवटी सचिनचाच गट जिंकला. त्यानंतर सचिननं नवोदित खेळाडूंशी संवाद साधला. त्यांना मार्गदर्शन करून सल्लाही दिला. यावेळी माणदेशी चॅम्पियन्सचे अध्यक्ष प्रभात सिन्हा जिल्हा, पोलीस अधीक्षक समीर शेख उपस्थित होते.
माणदेशी चॅम्पियन्सच्या आधुनिक स्टेडियमचं सचिन तेंडुलकरच्या हस्ते उद्घाटन (Source - ETV Bharat Reporter) मस्ती करायलाच पाहिजे : बालपणातील आठवणी सांगताना सचिन तेंडुलकर म्हणाला, "लहानपणी मी सुद्धा खूप मस्तीखोर होतो. मस्ती करायलाच पाहिजे. त्यात काही चुकीचं नाही. तुम्ही मस्ती करता की नाही? असा प्रश्न सचिनने यावेळी मुलांना विचारला. "ज्यावेळी तुमचे प्रशिक्षक, आई-बाबा तुम्हाला काही सांगतात, ते ऐकणंही महत्वाचं असतं," असा सल्ला सचिनने मुलांना दिला.
हेही वाचा
- संघर्षातून पुढं येत मोठ्या संघांना पराभूत केल्यावर अफगाण संघ पुन्हा इतिहास रचण्यास सज्ज! 'इथं' पाहा लाईव्ह मॅच
- पोलिसांसोबत सामना खेळायला आलेल्या खेळाडूनं पाकिस्तानला हरवलं, झाला 'मॅन ऑफ द मॅच'
- दोन भाऊ इंग्लंड संघात तर तिसऱ्या भावाची झिम्बाब्वे संघात एंट्री...