महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डोंबिवली एमआडीसी मधील दोन कंपनीत भीषण आग; जीवितहानी नाही, कंपन्यांचं मोठं नुकसान - Dombivli MIDC Fire - DOMBIVLI MIDC FIRE

Dombivli MIDC Fire : भीषण स्फोटामुळं डोंबिवली पुन्हा एकदा हादरली आहे. इथल्या एमआयडीसी मधील दोन केमिकल कंपन्यांमध्ये आज मोठी आग लागली. या घटनेमुळं एमआयडीसी (MIDC) परिसरात प्रचंड घबराट पसरली आहे.

Thane Fire News
दोन कंपनीत भीषण आग (ETV BHARAT Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 12, 2024, 5:08 PM IST

ठाणे Dombivli MIDC Fire:डोंबिवली एमआयडीसीतील (MIDC) 'इंंडो अमाईन्स' (Indo Amines) या किटकनाशक बनवणाऱ्या रासायनिक कंपनीत बुधवारी सकाळच्या सुमारास स्फोट होऊन भीषण आग लागली. आग लागताच इंंडो अमाईन्स कंपनीसह लगतच्या माल्दे कॅपीसिटर्स कंपनीमधील कर्मचारी तत्काळ कंंपनी बाहेर आल्यानं मोठी जीवितहानी टळली. दोन्ही कंपन्यांचं आगीत मोठं नुकसान झालं.

प्रतिक्रिया देताना पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ (ETV BHARAT Reporter)


कशी घडली घटना : गेल्या महिन्यात एमआयडीसीतील अमुदान कंंपनीत भीषण स्फोट होऊन डोंबिवली परिसर हादरला होता. या स्फोटात १६ कामगारांचा मूत्यू झाला होता. या स्फोटानं डोंबिवलीतील रहिवासी, उद्योजक अद्याप सावरले नसताना, बुधवारी सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास इंडो अमाईन्स कंपनीत स्फोट झाला. स्फोटानंंतर कंपनीतील रासायनिक ज्वलनशील वस्तुंंना आग लागली. बघता बघता आगीनं रौद्ररूप धारण केलं होतं. इंडो अमाईन्स कंपनीत शेतीविषयक उत्पादनं तयार केली जातात. या उत्पादनांनी भरलेले पिंप आगीनं लपेटताच कंपनीत स्फोटांची मालिका सुरू झाली. सुरूवातीला कंपनी कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. आगीनं रौद्ररूप धारण करताच कर्मचाऱ्यांचे प्रयत्न तोकडे पडले.



माल्दे कॅपीसिटर्स कंपनी पेटली : इंडो अमाईन्समधील कंपनीच्या झळा जवळच्या माल्दे कॅपीसिटर्स कंपनीला लागल्या. येथील सुमारे अठरा कर्मचारी तत्काळ कंपनीतून बाहेर पडले. या कंपनीत मीटरला लावणारे कॅपीसिटर्स तयार केले जातात. वीज वाहक तारांचे गठ्ठे या कंपनीच्या आवारात होते. या कंपनीत ज्वलनशील सामान असल्यानं माल्दे कॅपीसिटर्स कंपनीनं पेट घेतला. या कंपनीतील प्लास्टीकनं पेट घेताच काळ्या धुराचे लोळ आकाशाच्या दिशेने जात होते.



अग्निशमन बंंब घटनास्थळी दाखल :आगीची माहिती मिळताच सुरूवातीला कल्याण डोंबिवली पालिकेचे तीन अग्निशमन बंंब घटनास्थळी दाखल झाले होते. जवानांनी पाण्याचे फवारे मारून परिसरातील कंपन्यांमध्ये आग पसरणार नाही याची काळजी घेतली. आगीच्या ज्वालांवर फोमचे फवारे मारून आग विझवली जात होती. ऊन वाढत गेल्यानं आगीचा भडका होण्याची शक्यता असल्यानं आणखी आठ अग्निशमन बंब बोलवण्यात आले होते. चारही बाजूनं इंडो अमाईन्स, माल्दे कंपनीच्या आगीवर जवानांनी पाण्याचा सततचा मारा केला. पाण्याचा मारा करूनही आग आटोक्यात येत नसल्यानं सुरूवातीला आजूबाजूच्या कंपनी मालकांमध्ये अस्वस्थता पसरली होती. परिसरातील नागरिक वस्त्यांमध्ये घबराट पसरली होती.

आगीत कंपनीचं मोठं नुकसान :सततचा पाण्याचा मारा करून अग्निशमन जवानांनी पाच तासांच्या अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळविलं. दोन्ही कंपनीच्या व्यवस्थापनांनी कंपनीत कोणीही कर्मचारी नसल्याची खात्रीशीर माहिती आपत्कालीन यंत्रणांना दिली होती. त्यामुळं आगीवर नियंत्रण मिळवणं एवढंच लक्ष्य आपत्कालीन यंत्रणांनी ठेवलं होतं. इंडो अमाईन्स, माल्दे कंपनीचं आगीत मोठं नुकसान झालं आहे. इंडो अमाईन्स कंपनीत अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करून उत्पादन घेतलं जाते. तरीही या कंपनीला आग कशी आग लागली, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.



कंपनी चालकांमध्ये अस्वस्थता :इंडो अमाईन्स कंपनीला आग लागताच पोलिसांनी या कंपनीच्या परिसरातील रहिवाशांना घराबाहेर पडण्याच्या सूचना केल्या. सुरक्षिततेचा उपाय म्हणून या कंपनी जवळील अभिनव शाळेतील विद्यार्थी सुरक्षितपणे शाळेबाहेर काढून शाळेला सुट्टी देण्यात आली. कंपनी परिसरात उभ्या असलेल्या बस, रिक्षा, दुचाकी आगीत खाक झाल्या आहेत. यामधील काही वाहनं कंपनी कर्मचाऱ्यांची असण्याची शक्यता वर्तवण्यात आली. तर दुसरीकडं अमुदान कंपनी स्फोटानंतर राज्य शासनाने एमआयडीसीतील ३० कंपन्या बंद केल्या. या प्रकारानं उद्योजक अस्वस्थ असताना, आता पुन्हा एमआयडीसीत रासायनिक स्फोट झाल्यानं कंपनी चालकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.


आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश :पोलीस उपायुक्त, सचिन गुंजाळ यांनी सांगितलं की, इंडो अमाईन्स कंपनीत स्फोट होऊन कंपनीला आग लागली. ही आग जवळच्या माल्दे कॅपीसिटर्स कंपनीत पसरली. या दोन्ही कंपन्यांमध्ये कर्मचारी नव्हते. त्यामुळं जीवित हानी झाली नाही. मात्र वित्त हानी झाली आहे. या कंपन्यांच्या आगीवर पूर्ण नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन जवानांना यश आलं आहे. तर अग्निशमन विभागाचे मुख्य अधिकारी नामदेव चौधरी यांनी सांगितलं की, १३ फायरच्या गाड्या आणि अनेक पाण्याचे टँकरच्या सहाय्यानं आग नियंत्रणात आणली आहे. आग कशामुळं लागली हे आता तपासानंतर स्पष्ट होईल. तांत्रिक कारण हेच आगीचं कारण असतं. तरी या आगीचं कारण चौकशीतून स्पष्ट होईल.

हेही वाचा -

  1. डोंबिवलीत पुन्हा अग्नितांडव; औद्योगिक वसाहतीतील केमिकल कंपनीत स्फोट, धुराच्या लोटानं नागरिक हैराण - Dombivli Blast Fire
  2. डोंबिवली एमआयडीसीतील केमिकल कंपनीमध्ये भीषण स्फोट; आठ ठार, पाच लाखांची मदत जाहीर, राष्ट्रपतींकडून शोक व्यक्त - Dombivli MIDC Blast
  3. जळगावात केमिकल कंपनीला भीषण आग; अनेक कर्मचारी जखमी, पाहा व्हिडिओ - Fire in Jalgaon MIDC

ABOUT THE AUTHOR

...view details