अमरावती : मेळघाटातील गव्हाचं कोठार अशी ओळख असणार्या चिखलदरा तालुक्यातील मसोंडी या गावातील सर्व शेतशिवारं हिरवीगार झाली आहेत. समुद्रसपाटीपासून 1 हजार 180 मीटर उंचीवर घनदाट जंगलात वसलेलं 500 लोकसंख्या असणारं हे गाव सध्या अगदी हिरवंगार झालंय. गव्हाच्या उत्पादनामुळं मसोंडी हे छोटसं गाव समृद्ध गाव म्हणून ओळखलं जाते. या गावातील दर्जेदार गहू खरेदी करण्यासाठी चक्क व्यापारी या गावात पोहोचतात. एकूणच गव्हाचं कोठार अशी ओळख असणाऱ्या मसोंडी या गावातील गव्हासंदर्भात "ईटीव्ही भारत"चा हा स्पेशल रिपोर्ट
मसोंडीच्या गव्हाचं असं आहे वैशिष्ट्यं : "उंच डोंगरावर असणार्या मसोंडी या गावातील रहिवाशांचा मुख्य व्यवसाय हा शेती असून या गावातील शेतात गव्हाशिवाय इतर कुठलंही पीक येत नाही. लोकवान प्रजातीचा गहू या गावातील शेतात होतो. विशेष म्हणजे केवळ शेणखताचा वापर शेतामध्ये होत असून कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत किंवा फवऱ्यांचा वापर न करता खाण्यासाठी अतिशय दर्जेदार असा गहू मसोंडी या गावात होतो," अशी माहिती गावाचे माजी उपसरपंच मारूती गायन आणि शिक्षक मल्हार तालनकर यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना दिली.
'मसोंडी' गहू उत्पादनासाठी प्रसिद्ध गाव (Source - ETV Bharat Reporter) वर्षभरात शंभर क्विंटल गव्हाचं उत्पन्न : "मसोंडी हे गाव एकूण तीन भागात विभागलं असून गावाच्या सुरुवातीलाच राहणाऱ्या ग्रामस्थांच्या शेतात सुमारे 400 क्विंटल गहू होतो. गावालगतच असणाऱ्या शेतातून ग्रामस्थ तीनशे क्विंटल गव्हाचं उत्पन्न घेतात, तर गावाच्या मागच्या बाजुला धरणालगत शेतात 500 क्विंटल गव्हाचं उत्पन्न घेतलं जातं. गावात वर्षाकाठी हजार ते दीड हजार क्विंटल गव्हाचं उत्पन्न होतं," अशी माहिती मारुती गायन यांनी दिली.
गव्हाला मोठी मागणी :मसोंडी येथील गव्हाचा दाणा हा सर्वसाधारण भागातील गव्हाच्या दाण्यापेक्षा थोडासा टणक आहे. अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मसोंडीचा गहू अगदी काही क्षणातच विकला जातो. यासह लगतच्या मध्य प्रदेशात देखील मसोंडीच्या गावाला प्रचंड मागणी आहे. सर्वात विशेष बाब म्हणजे गावातील शेतकरी क्वचितच अचलपूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत गहू विकायला जातात. अचलपूर आणि मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील व्यापारी हे गहू खरेदी करण्यासाठी थेट मसोंडी गावात शेतकऱ्यांच्या दारी येतात इतकं मसोंडीतील गव्हाला महत्त्व आहे.
धरणामुळं गव्हाला पाणी : मसोंडी या गावात फार पूर्वीपासून गव्हाचं उत्पन्न घेतलं जात असून पूर्वी गावातील शेतकरी पावसाचं पाणी कसं बस गावातच अडवून ठेवत असत. मात्र, आता गावात पूर्वीसारखं पाणी साठवून ठेवणं कठीण असल्यामुळं सलग दोन वर्ष ग्रामस्थांनी शासन स्तरावर पाठपुरावा करून गावात पाणी अडवण्यासाठी मदत करावी, अशी मागणी केली. प्रशासनाच्या वतीनं गावालगतच दोन वर्षांपूर्वी एक छोटं धरण बांधल्यानं गावात आता मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला. परिणामी गव्हासाठी लागणारं पाणी शेतकऱ्यांना मुबलक स्वरूपात उपलब्ध झालं, यामुळं प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात गहू बहरलेला दिसतो.
असं होतं गव्हाचं उत्पन्न : "मसोंडी गावातील शेतकरी ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या चार महिन्यात आपल्या शेतात गव्हाचं उत्पन्न घेतात. मसोंडी गाव हे दाट जंगलात वसलं असल्यामुळं वन्य प्राण्यांचा वावर या परिसरात मोठ्या संख्येत आहे. अशा परिस्थितीत शेतातील गव्हाच्या संरक्षणासाठी घरातील सर्व सदस्य चारही महिने शेताचं संरक्षण करतात, अनेक शेतकरी तर संपूर्ण चार महिने शेतातच मुक्कामी असतात," अशी माहिती गावकऱ्यांनी दिली.
हेही वाचा
- मेळघाटात सतीशिळा; का जात होत्या स्त्रिया पतीपश्चात सती? सती प्रथा भारतात कशी रुजली? वाचा "ईटीव्ही भारत"चा स्पेशल रिपोर्ट
- विदर्भातील शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी केळी; अनेक भागात भरघोस उत्पादन
- अख्खं गावच करतंय दर्जेदार खुरप्यांचा व्यवसाय; थेट कर्नाटक बिहारसह परराज्यातून मागणी