छत्रपती संभाजीनगर Maratha Vs OBC Reservation : राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून रणकंदन माजण्याची शक्यता निर्माण झाली. दहा महिन्यांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केलं होतं. कालांतरानं ओबीसी तसंच मराठा, असा संघर्ष पेटत असताना छगन भुजबळांनी केलेल्या टीकेमुळं आंदोलन कुठल्या दिशेनं जाईल याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. त्यातच आठ दिवसांपूर्वी ओबीसी समाजाचे कार्यकर्ते लक्ष्मण हाके तसंच नवनाथ वाघमारे यांनी उपोषण सुरू केलं होतं. दोनही आंदोलन शांततेच्या मार्गानं सुरू होती. आता दोन्ही आंदोलनं चिघळण्याची शक्यता निर्माण झालीय.
मराठा-ओबीसी आंदोलन समोरासमोर :अंतरवाली सराटी गाव गेल्या वर्षभरापासून चांगलंच चर्चेत आलंय. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला राज्यात वेगळीच दिशा पाहायला मिळाली. त्यामुळं अगदी दुर्लक्षित असलेलं छोटसं गाव देशभर चांगलंच चर्चेत आलंय. गेल्या दहा महिन्यांपासून या ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनाची दखल राज्य तसंच केंद्र सरकारांना घ्यावी लागली. अद्याप मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागला नसला, तरी मात्र गावात शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाचे परिणाम दिसून येताय. विशेषतः नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील दिग्गज नेत्यांना मराठा आरक्षणाच्या मागणीवरून चांगलाच दणका बसलाय. माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे या दोन दिग्गज नेत्यांसह इतर नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर अचानक ओबीसी कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलं. संभाजीनगर सोलापूर महामार्गावर उजव्या बाजूला आंतरवाली सराटी, तर डाव्या बाजूला वडीगोद्री ही दोन गाव आहेत. महामार्गावर जाताना या दोन गावांकडे कोणाचं लक्षही नव्हतं, मात्र आता ही दोन्ही गाव परस्परविरोधी आंदोलनामुळं चांगलीच चर्चेत आली आहेत. कारण अंतरवाली सराटीत मराठा आंदोलन सुरू असून दुसरीकडं वडीगोद्रीत ओबीसी आंदोलन सुरू आहे. त्यामुळं दोन्ही गावात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. दोन समाजातील घटक समोरासमोर आल्यानं राज्यात चांगलाच परिणामकारक ठरतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे.