जालना Manoj Jarange Health Deteriorated :मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 9 वा दिवस आहे. मंगळवारी रात्री मनोज जरांगे यांची प्रकृती अधिकच खालावली. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या समर्थकांच्या दबावामुळे डॉक्टरांनी अखेर मनोज जरांगे यांना सलाईन लावलं. मनोज जरांगे यांची तब्बेत खालावल्यानं धुळे - सोलापूर आणि जालना - वडीगोदरी महामार्ग जरांगे समर्थक आंदोलकांनी रोखून धरला. त्यामुळे आंदोलकांकडून आणखी अनुचित प्रकार घडू नये, म्हणून यावेळी सगळ्यांना शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आलं. यावेळी पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देत मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
मनोज जरांगे यांना मध्यरात्री लावलं सलाईन :मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी तब्बल सहाव्यांदा आपलं उपोषण सुरू केलं आहे. अंतरवाली सराटी या गावात मनोज जरांगे हे पुन्हा उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज 9 वा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी विविध परिसरातील त्यांचे समर्थक येत आहेत. मंगळवारी मध्यरात्री मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्यानं त्यांच्या समर्थकांनी मोठा आक्रोश केला. मनोज जरांगे यांच्या समर्थकांनी त्यांना उपचार घेण्याची विनंती केली. त्यामुळे डॉक्टरांनी मनोज जरांगे यांना मध्यरात्री सलाईन लावलं.