पुणे Maratha Reservation Protest : तोडगा निघत नाही तोपर्यंत आपण मागं हटणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी घेतली आहे. त्यामुळं सरकारची डोकेदुखी वाढली आहे. मनोज जरांगे पाटील हे शुक्रवारी मुंबईत दाखल होणार असून, ते आझाद मैदानावर उपोषण करण्यावर ठाम आहेत. दुसरीकडं मराठा समाजाच्या रोषाला लोकप्रतिनिधींना सामोरं जावं लागत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मराठा समाजानं काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केलाय.
अजित पवारांना दाखवले काळे झेंडे : मनोज जरांगे पाटील हे लाखो मराठा समाजाला घेऊन मुंबईकडं कूच करत आहेत. तर दुसरीकडं राज्यातील विविध शहरांमध्ये मराठा बांधव आंदोलन करत आहेत. यादरम्यान, मराठा कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले. जुन्नर विधानसभेचा दौरा करत असताना अजित पवारांच्या ताफ्यासमोर येत कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केलाय. यावेळी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.