नागपूर Maoist Links Case : कथित नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जी एन साईबाबा यांना जन्मठेप ठोठवण्यात आली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं मंगळवारी जी एन साईबाबा यांच्यासह पाच आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयानं जी एन साईबाबा यांची जन्मठेप रद्द केल्यानं त्यांना मोठा दिलासा मिळाला. न्यायमूर्ती विनय जोशी आणि न्यायमूर्ती वाल्मिकी एस ए मिनेझिस यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला आहे. नागपूर खंडपीठानं जी एन साईबाबा यांच्यासह प्रशांत राही, हेम मिश्रा, महेश तिरकी आणि विजय तिरकी यांचीही निर्दोष मुक्तता केली आहे.
जी एन साईबाबा निर्दोष :दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जी एन साईबाबा यांची आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयानं या प्रकरणातील अन्य आरोपींची सुद्धा निर्दोष मुक्तता केली आहे. 90 टक्के शारीरिकदृष्ट्या अपंग असलेले जी एन साईबाबा यांना 2014 साली गडचिरोली पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आज तब्बल 10 वर्षानंतर नागपूर खंडपीठानं त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायमूर्ती विनय जोशी आणि वाल्मिकी एस ए मिनेझिस यांनी याप्रकरणी मोठा निर्णय दिला आहे.
50 हजारांच्या जात मुचलक्यावर सोडण्याचे निर्देश :जी एन साईबाबा आणि इतर चार आरोपीं कथित नक्षलवादी संबंध असल्याच्या प्रकरणात न्यायालयानं निर्दोष मुक्त केलं आहे. त्यामुळं हा राज्य सरकार आणि पोलीस दलाला मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे. यूएपीए UAPA लावताना नियमानुसार कारवाई झाली नव्हती, असा ठपका न्यायालयानं ठेवला आहे. तसेच साईबाबा आणि इतर आरोपींकडून डिजिटल पूरावे गोळा करताना नियम पाळले नव्हते. तसेच प्रोसिक्युशननं ठेवलेले पुरावे जी एन साईबाबा आणि इतर आरोपींचे नक्षलवाद्यांशी संबंध तपास यंत्रणा सिद्ध करू शकले नाहीत. या आधारावर जी एन साईबाबा, प्रशांत राही, हेम मिश्रा, महेश तिरकी आणि विजय तिरकी या सर्वांची सुटका करण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.