नागपूर - विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता महायुतीतील विजयी झालेल्यांपैकी अनेक उमेदवारांना मंत्रिपदाचे वेध लागले आहेत. त्यात आमदारकीची तिसरी आणि चौथी टर्म असलेल्यांचा दावा जरा मजबूत असला तरी जातीय समीकरण बघूनचं मंत्रिमंडळात आमदारांना स्थान मिळेल याची काहींना आशा आहे.
विदर्भातील एकूण ६२ पैकी ३९ जागी महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामध्ये असे काही आमदार आहेत ज्यांची तिसरी, चौथी किंवा पाचवी टर्म आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस हे सहव्यांदा विधानसभेत निवडून गेले आहेत, तर कृष्णा खोपडे, चंद्रशेखर बावनकुळे यांची चौथी टर्म आहे. समीर कुणावार, पंकज भोयर, समीर मेघे, आशिष जैस्वाल, रवी राणा, संजय कुटे यांची हॅट्ट्र्रिक झाली आहे. त्यामुळे ते मंत्रपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे आहे अशी चर्चा सुरू झाली आहे. पूर्व विभागात यांची नावं चर्चेत आहेत.
मोठे नेते मंत्रिपदाच्या रांगेत - भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे कामठी येथून विजयी झाले आहेत. ओबीसी चेहरा म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यामुळे नवीन मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागेल असं चित्र निर्माण झालं आहे. याशिवाय एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्ती समजले जाणारे रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांची आमदारकीची पाचवी टर्म असल्यानं ते देखील मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार असणार आहेत. नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघातून तब्बल 1 लाख 16 हजार मतांनी सलग चौथ्यांदा आमदार झालेले कृष्णा खोपडे हे सुद्धा मंत्रिपदाच्या रेसमध्ये आहेत. चंद्रपूर येथील बल्लारपूर येथून माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार सलग सातव्यांदा विधानसभेत निवडून गेले आहेत. त्यामुळे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांची वर्णी निश्चित मानली जात आहे. बंटी भांगडिया धर्मरावबाबा आत्राम यांचा दावा नाकारता येत नाही. याशिवाय नरेंद्र भोंडेकर आणि देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय परिणय फुके हे देखील शर्यतीत पुढे असणार आहेत.
पश्चिम विदर्भातील दावेदार - पश्चिम विदर्भात बडनेरा विधानसभा मतदारसंघात सलग चौथ्यांदा विजयी झालेले रवी राणा यावेळी मंत्रिपदाचे दावेदार असून अमरावती विधानसभा मतदारसंघात विजयी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सुलभा खोडके या देखील मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये अमरावती जिल्ह्यात यशोमती ठाकूर या कॅबिनेट मंत्री आणि बच्चू कडू राज्यमंत्री होते. यामुळे अमरावती जिल्ह्यातील रवी राणा आणि सुलभा खोडके या दोघांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. धामणगाव विधानसभा मतदारसंघात दुसऱ्यांना विजयी झालेले प्रताप अडसड यांना मंत्रीपद मिळेल अशी चर्चा आहे.
महायुतीचे इतर दावेदार - यवतमाळच्या दिग्रस विधानसभा मतदारसंघातून सलग पाचव्यांदा निवडून येणारे संजय राठोड, राळेगाव विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले अशोक डहाके आणि पुसद विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आलेले इंद्रनील नाईक यांची नावं देखील मंत्रिपदाच्या शर्यतीत असून यापैकी संजय राठोड यांची मंत्रिमंडळात निश्चितच वर्णी लागेल असं बोललं जातंय. तर अकोला जिल्ह्यातील अकोट विधानसभा मतदार संघातून तिसऱ्यांदा विजयी झालेले भाजपाचे प्रकाश भारसाकळे विधानसभेत सातव्यांदा प्रतिनिधित्व करणार असून यापूर्वी भारसाकळे हे दर्यापूर मतदार संघातून एकवेळा काँग्रेस आणि तीनवेळा शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले आहेत. प्रकाश भारसाकळे हे अकोला जिल्ह्यातून मंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर असून अकोला पश्चिम मतदार संघात तिसऱ्यांदा विजयी झालेले भाजपाचे रणधीर सावरकर हे देखील मंत्री पदाचे दावेदार आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात विजयी झालेले संजय कुटे हे देखील मंत्री पदाचे तगडे दावेदार मानले जात आहेत.
हेही वाचा..
- मुख्यमंत्री पदी पुन्हा देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे? अजित पवार म्हणाले, "कुठलीही चर्चा..."
- भाजपाचा मुख्यमंत्री ठरल्यास आम्ही एकमुखाने देवेंद्र फडणवीसांचं नाव घेऊ- चंद्रकांत पाटील