महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'नीट'नंतर आता सीईटी परीक्षेत मोठा गोंधळ, पेपरमध्ये ५४ चुका; आदित्य ठाकरेंचा मोठा दावा - Aaditya Thackeray On CET Paper

Aaditya Thackeray On CET Paper : नीट परीक्षेच्या गोंधळानंतर आता राज्यातील सीईटी परीक्षेत मोठा गोंधळ झाल्याचा आरोप शिवसेना उबाठाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. सीईटीच्या प्रश्नपत्रिकेत तब्बल ५४ चुका झाल्या आहेत. त्यामुळे ज्यांनी प्रश्नपत्रिका तयार केली त्यांचीच परीक्षा घेण्याची वेळ आली आहे, असे ठाकरे म्हणाले.

Aditya Thackeray On CET Paper Fraud
आदित्य ठाकरे (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 21, 2024, 6:31 PM IST

Updated : Jun 21, 2024, 6:51 PM IST

मुंबई Aaditya Thackeray On CET Paper : राज्यातील सीईटी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला होता. त्यानुसार विद्यार्थी आता पुढील प्रवेश प्रक्रियेची तयारी करत होते. अशातच आता या सीईटी परीक्षेत मोठा गोंधळ झाल्याचा दावा आमदार आदित्य ठाकरे यांनी केलाय. पत्रकार परिषद घेत ठाकरे यांनी परीक्षेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राज्य सरकारला धारेवर धरलं.

आदित्य ठाकरेंचा दावा : "सीईटी सेलकडून गुणांऐवजी पर्सेंटाईल दिले जातात. त्यामध्ये देखील गोंधळ झालाय. कमी गुण मिळालेल्यांना जास्त पर्सेंटाईल आणि जास्त गुण मिळालेल्यांना कमी पर्सेंटाईल देण्यात आले आहेत. त्यामुळे पर्सेंटाईल ठरविण्याचे नेमके निकष काय आहेत, याची माहिती सीईटी सेलने देण्याची गरज आहे. सीईटी सेलच्या कारभारात पारदर्शकता नाही," असा आरोप आमदार आदित्य ठाकरेंनी केला. या परीक्षेत गैरव्यवहार झालाय. त्यामुळं सीईटीच्या आयुक्तांना निलंबित का करण्यात आलं नाही?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड : "सीईटीच्या भौतिकशास्त्राच्या पेपरमध्ये एका प्रश्नाला उत्तर म्हणून चार पर्याय देण्यात आले होते. मात्र, ते चारही पर्याय चुकीचे असल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला. अभियांत्रिकीसाठी तर एका पेपरसाठी वेगवेगळ्या २४ प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. परीक्षा झाल्यानंतर पेपरची पुन्हा तपासणी करण्यासाठी एक हजार रुपयांचे शुल्क आकारले जाते. १२४५ विद्यार्थ्यांनी हरकत घेऊन फेरतपासणीची मागणी केली. त्यामुळे त्या प्रमाणात विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड बसला व सीईटी सेलने पैसे कमावले," असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलाय. सीईटीमध्ये कोणत्याही विद्यार्थ्याची पुन्हा परीक्षा नको अशी मागणी त्यांनी केली. सीईटीची परीक्षा घेणाऱ्यांची योग्यता तपासण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

३७ विद्यार्थ्यांना शंभर पर्सेंटाइल : "राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी) अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, कृषी आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात येते. यावर्षी या परीक्षेत राज्यातील ३७ विद्यार्थ्यांना शंभर पर्सेंटाइल मिळाले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी एक हजार रुपये भरून फेरतपासणी करण्याची मागणी केली आहे, त्या विद्यार्थ्यांचे शुल्क सीईटी सेलने परत करावे," अशी मागणी ठाकरे यांनी केली. "आमचे सरकार सत्तेत आल्यानंतर आम्ही एकच प्रश्नपत्रिका ठेवू," असे आश्वासन त्यांनी दिले.

बेस्टची दरवाढ होणार, पावसाळ्यात पोलीस भरती का? : मुंबई महापालिकेकडून बेस्ट उपक्रमाला आर्थिक सहाय्य न मिळाल्यानं आता बेस्टची दरवाढ होईल. सगळीकडे लूट सुरू असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली. पावसाळ्यात पोलीस भरती का घेतली जात आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. "पोलीस भरतीसाठी साधारणपणे साडे सतरा हजार पदांसाठी १७ लाखांहून अधिक अर्ज आले आहेत. त्यामुळे राज्यात किती प्रमाणात बेरोजगारी आहे याचे चित्र समोर आले आहे. या पदांसाठी अनेक उच्चशिक्षित उमेदवारांनी अर्ज केले आहेत. तरुणाईच्या हाताला रोजगार मिळत नसल्यानं तरुणांमध्ये नाराजी आहे. मनात राम आणि हाताला काम, असं आमचं हिंदुत्व आहे. मात्र, भाजपाच्या मनात राम नाही व तरुणांना काम देखील देत नाही. मिंधे सरकार यावर काहीच उपाययोजना करत नसल्यानं आम्हाला आंदोलन करावं लागेल," असा इशारा त्यांनी दिला.

हेही वाचा:

  1. चित्तथरारक! पोलीस कर्मचाऱ्याची दोन मिनिट तीस सेकंद पाण्याखाली योगसाधना! - International Yoga Day 2024
  2. सायबर गुन्हेगारांनो सावधान! क्लिष्ट सायबर गुन्ह्यांची चुटकीत होणार उकल, पोलीस करणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर - देवेंद्र फडणवीस - Devendra Fadnavis On Cyber Crime
  3. ''बाळासाहेब ठाकरे यांनी दिघेंना संपवलं तसं शिंदे साहेब...'' बच्चू कडू यांना जीवे मारण्याची धमकी - Threat to Bachu Kadu
Last Updated : Jun 21, 2024, 6:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details