मुंबई Manoj Jarange Patil On Prasad Lad : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षणावरुन कथित आक्षेपार्ह विधान केलंय. त्यांच्या या विधानाचे पडसाद महाराष्ट्रात उमटल्याचं पहायला मिळतंय. भाजपाचे नेते प्रसाद लाड यांनी राहुल गांधी यांच्या विधानावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती. तसंच मनोज जरांगे पाटील तुमच्यात हिंमत असेल तर राहुल गांधींचा बुरखा फाडा, असं आव्हानही त्यांनी केलं होतं. यावरून आता मनोज जरांगे पाटलांनी लाड यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
जरांगे पाटील यांचं प्रत्युत्तर : यासंदर्भात बोलतांना मनोज जरांगे पाटील यांनी, ''आम्ही प्रश्न विचारणार मग तुम्ही कशासाठी आहात? राहुल गांधींना आरक्षणाबाबत प्रश्न विचारायला आम्ही तुमचे नोकर आहोत का? हे देवेंद्र फडणवीस यांना वाचवणारे लोक आहेत", अशी टीका लाड यांच्यावर केली आहे.
प्रसाद लाड काय म्हणाले होते? : प्रसाद लाड यांनी एका व्हिडिओ पोस्टद्वारे मनोज जरांगे पाटलांवर निशाणा साधला. "मनोज जरांगे पाटलांनी हिंमत असेल तर दोन तासांमध्ये पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस आणि राहुल गांधी यांचा बुरखा फाडावा. त्यांनी जर असं केलं तर आम्ही तुम्हाला खरे मराठा आंदोलक आणि मराठ्यांचे खरे नेते समजू. जर असं झालं नाही तर तुमचे बेगडी मराठा प्रेम तसंच मराठ्यांना फसवण्याचे उद्दिष्ट जनतेपुढं उघड होईल. हे सर्व टाळण्यासाठी तुम्हाला काँग्रेस आणि महाविकास आघाडी विरोधी भूमिका घेऊन त्यांचा बुरखा फाडावाच लागणार आहे," असाही हल्लाबोल प्रसाद लाड यांनी केला होता.