मुंबई Manoj Jarange Times Square : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांचा जलवा थेट अमेरिकेत पाहायला मिळालाय. येथील 'टाइम्स स्क्वेअर'वर जरांगे पाटलांचे फोटो झळकले आणि देशभरात चर्चा सुरू झाली ''हू इज जरांगे पाटील?". मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नुकताच वाढदिवस झाला. त्यांचा फोटो अमेरिकेतील 'टाइम्स स्क्वेअर'वर लागला होता. त्यामध्ये मनोज जरांगेही झळकले.
जरांगे पाटलांची चर्चा थेट अमेरिकेत :मागील काही दिवसांपासून राज्यभरातच नाही तर देशभरात मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचं हत्यार उगारणारे मनोज जरांगे पाटील यांचीच चर्चा सुरू होती. आता त्यांची झलक विदेशातही पाहायला मिळालीय. या घटनेला निमित्त आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचं. शिंदे यांचा शुक्रवार (9 जानेवारी) 60 वा वाढदिवस साजरा झाला. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचे फोटो अमेरिकेतील 'टाइम्स स्क्वेअर'वर झळकले. त्यामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटीलही मुख्यमंत्र्यांसोबत पाहायला मिळाले. त्यानंतर, राज्यभरातील एकनाथ शिंदे यांच्यासह मनोज जरांगे पाटील यांचे कार्यकर्ते ''नाद केला पण वाया नाय गेला'' अशी प्रतिक्रिया देत आहेत.
अमेरिकेत मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस : गेल्या काही दिवसांपासून खासदार संजय राऊत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गुंडांबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेयर करत आहेत. हे गुंडांचं राज्य असून, गुंडांचं सरकार ते चालवत असल्याची टीका राऊत करत आहेत. त्यामुळं दोन्ही गटांमध्ये वाकयुद्ध रंगलंय. अशातच आता एकनाथ शिंदे यांचे फोटो थेट अमेरिकेत झळकल्यानं चर्चा सुरू झालीय. वाढदिवसानिमित्त आता थेट अमेरिकेतील सुप्रसिद्ध 'टाइम्स स्क्वेअर'वर चौकात मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हिडिओच्या माध्यमातून झळकल्यानं कार्यकर्त्यांमध्ये काहीसं आऩंदाचं वातावरण आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 9 जानेवारी रोजी 60 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. शिंदे यांचा वाढदिवस महाराष्ट्रातच नाही तर देशभरात आणि देशाबाहेरही साजरा करण्यात आला. युवासेना पदाधिकारी राहुल कनाल यांनी अमेरिकेत 'टाइम्स स्क्वेअर'वर व्हिडिओ झळकावत मुख्यमंत्री शिंदे यांना वाढदिवसानिमित्त ''सरप्राइज गिफ्ट'' दिलंय.
सहकाऱ्यांचेही फोटो :अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील 'टाइम्स स्क्वेअर'मध्ये मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात आलेल्या व्हिडिओमधून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या विजयी क्षणाचा फोटोही झळकला. तसंच, या व्हिडिओमध्ये खासदार श्रीकांत शिंदे, युवासेना पदाधिकारी राहुल कनाल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांचाही फोटो यामध्ये झळकलाय.
थेट अमेरिकेत फोटो प्रसिद्ध : मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी पोस्टर्स लावणं, सोशल मीडियावर पोस्ट लिहिणं तसंच, मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमीत्त वेगवेगळे कार्यक्रम आयोजीत करणं असे अनेक प्रकार आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. मात्र, राहुल कनाल यांनी थेट अमेरिकेतील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ झळकावलाय. त्यामुळे या व्हिडिओची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे.