छत्रपती संभाजीनगर Manoj Jarange Patil On Goverment : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे सातत्यानं ओबीसी समाजातून मराठ्यांना आरक्षण मिळावं, यासाठी आंदोलन करत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी आज (30 सप्टेंबर) पत्रकार परिषद घेत अनेक विषयांवर भाष्य केलय. यावेळी त्यांनी राज्य सरकारसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाण साधला.
पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही :पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिलाय. "सरकारनं आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मराठा समाजाचा ओबीसीत समावेश केला नाही, तर आगामी निवडणुकीत पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही."
अमित शाह सूर्य आहेत का? : जरांगे पाटील यांनी रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जरांगे पाटलांनी अमित शाहांवर बोलणं म्हणजे सूर्यावर टीका करण्यासारखं आहे, असं म्हटलं होतं. त्यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले, टीका न करण्यासाठी अमित शाह हे काय सूर्य आहेत का? ते केवळ केंद्रीय गृहमंत्री आहेत. मराठ्यांचं आंदोलन सरकारनं गोडीगुलाबीनच हाताळावं. मराठ्यांचा नाद करू नका. पटेल, जाट, गुर्जर एकत्र आले, तर तुम्हाला बाहेर पडणं देखील अवघड होईल. दिल्लीचं आंदोलन, शेतकरी आंदोलन किंवा पंजाबचं आंदोलन कसं हाताळलं ते आम्हाला सांगू नका, असा इशारा यावेळी जरांगे पाटील यांनी दिला.