मुंबई Manohar Joshi Passed Away : राजकारणातील 'कोहिनूर' म्हणून राजकारणात मनोहर जोशी यांनी आपला ठसा उमटवला होता. आज पहाटे माजी मुख्यमंत्री तथा माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांनी अखेरचा श्वास घेतला. राजकारणात इतकी मोठी पदं भूषवलेले मनोहर जोशी यांचं बालपण मात्र मोठं हलाखीत गेलं. त्यांचे वडील भिक्षुकी करत असल्यानं त्यांनीही काही काळ भिक्षुकी करुन आपलं जीवन व्यतीत केलं. एक भुक्षुक ते लोकसभेचे अध्यक्ष असा थक्क करणारा प्रेरणादायी प्रवास मनोहर जोशी यांचा आहे. मात्र आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवल्यानं हा प्रवास थांबला आहे.
भिक्षुकी करुन घेतलं शिक्षण :मनोहर जोशी यांचं मूळ गाव बीड जिल्ह्यात होतं, मात्र भिक्षुकी करत असल्यानं त्यांचे वडील रायगड जिल्ह्यात स्थलांतरित झाले. रायगड जिलह्यातील नांदवी इथं मनोहर जोशी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1937 ला झाला. त्यांचं अगोदरचं आडनाव ब्रह्मे, मात्र भिक्षुकीसाठी स्थलांतर करत असल्यानं त्यांचं आडनाव जोशी असं करण्यात आलं. नांदवी इथंच मनोहर जोशी यांनी काहीकाळ भिक्षुकी करत शिक्षण पूर्ण केलं. सरकारनं कमवा आणि शिका ही योजना आता अंमलात आणली. मात्र हलाखीची परिस्थिती असल्यानं मनोहर जोशी यांनी भिक्षुकी करत शिक्षण घेतल्यानं खरी कमवा आणि शिका असंच शिक्षण घेतल्याचं बोललं जाते. मनोहर जोशी यांनी भिक्षुकी करत आपलं शिक्षण पूर्ण केलं. नांदवी इथं पहिली ते चौथीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते चौथी ते सातवीपर्यंतच्या शिक्षणासाठी महाड इथं गेले. तर सातवी ते पुढील शिक्षण त्यांनी पनवेल इथं आपल्या मामाकडं पूर्ण केलं.
लिपिक ते लोकसभा अध्यक्ष :पनवेल इथं शिकत असताना मनोहर जोशी हे माटुंगा इथं नोकरीला लागले. त्यांचा पहिला पगार 55 रुपये होता. नोकरीसह त्यांनी आपलं शिक्षण सुरुच ठेवलं. त्यानंतर त्यांनी मुंबई महापालिकेत कंत्राटी लिपिक म्हणून नोकरीला सुरुवात केली. मात्र मराठी माणसानं विकास करायचा असल्यास शिक्षणासह उद्योग करायला हवा, असं त्यांचं ठाम मत होतं. त्यामुळं नोकरीत त्यांचं मन रमत नव्हतं. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहेच, ते प्यायलंच पाहिजे या तत्वावर त्यांनी आपली पदवी पूर्ण केली. त्यानंतर विधी शाखेची पदवीही घेतली. उच्च शिक्षण झाल्यानंतर मनोहर जोशी यांनी दादरमध्ये 7 डिसेंबर 1961 ला 'कोहिनूर' या संस्थेची स्थापना केली.
बाळासाहेब ठाकरेंनी पारखला 'कोहिनूर' :शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेना पक्षाची 1967 मध्ये मुंबईत स्थापना केली. यावेळी मनोहर जोशी यांनी मराठी माणसाच्या हक्कासाठी लढा देण्याचं ठरवलं. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर मनोहर जोशी आणि बाळासाहेब ठाकरे यांची चांगलीच गट्टी जमली. बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनोहर जोशी यांना तिकीट दिलं. यावेळी मनोहर जोशी यांनी मुंबई महापालिकेचे नगरसेवक म्हणून 1967 ते 1972 हा काळ प्रचंड गाजवला. त्यांच्या कार्याची दखल घेत बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना 1972 ते 1989 या काळात विधान परिषदेवर पाठवलं. त्यानंतर पुन्हा बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना 1976 ते 1977 या काळात मुंबईचं महापौर पद दिलं. बालासाहेब ठाकरे यांचे कडवट शिवसैनिक म्हणून मनोहर जोशी यांची ओळख होती. त्यामुळंच मनोहर जोशी यांना पुन्हा 1990 ते 1991 या काळात विरोधी पक्षनेता म्हणून निवडण्यात आलं. विरोधी पक्षनेता कसा असावा, याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जाते. त्यानंतर 1995 मध्ये शिवसेना भाजपा युतीचं सरकार राज्यात आलं. युतीचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला. मात्र अंतर्गत कलहामुळं त्यांना मुख्यमंत्री पद सोडावं लागलं. त्यानंतर नारायण राणे यांना त्यांच्या जागी मुख्यमंत्री नेमण्यात आलं. मनोहर जोशी यांनी त्यानंतर 2002 ते 2004 या काळात लोकसभा अध्यक्ष म्हणून जबाबदारी यशस्वीरित्या पूर्ण केली. त्यानंतरही शिवसेनेनं त्यांना उद्योगमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली होती. मात्र काही काळापासून ते राजकारणापासून अलिप्त होते.
हेही वाचा :
- राजकारणातील 'कोहिनूर' हरपला; मनोहर जोशी यांचं मुंबईत निधन
- 'या' कारणामुळं मनोहर जोशी मुख्यमंत्रिपदावरून झाले होते पायउतार