मुंबईMangal Prabhat Lodha:मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फक्त नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीला २०२४ लोकसभा निवडणुकीसाठी बिनशर्थ पाठिंबा जाहीर केला आहे. मनसे महायुतीत सामील होईल आणि दक्षिण मुंबई लोकसभा जागेवर उमेदवार मनसेकडून दिला जाईल, अशी शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये वर्तवली जात होती; परंतु आता मनसेने ही निवडणूक न लढण्याचा निर्धार घेतला असून त्यांनी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर केला आहे. याकरता दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात आता भाजपा अथवा एकनाथ शिंदे गटाकडून उमेदवार दिला जाणार आहे. यासाठी अनेक उमेदवारांची नावं चर्चेत असताना त्यातील एक म्हणजे राज्याचे मंत्री आणि या मतदारसंघातील मलबार हिल विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगल प्रभात लोढा.
दक्षिण मुंबईतून मंगल प्रभात लोढा इच्छुक :१८ व्या लोकसभेसाठी महायुतीत जागा वाटपाचा तिढा अद्याप शिल्लक आहे. विशेष म्हणजे महायुतीत येण्याबाबत राज ठाकरे यांची मनसे काय भूमिका घेते याकरिता जागा वाटपाचा तिढा संपुष्टात येत नव्हता; परंतु आता राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतर जागा वाटपात भाजपा आणि शिंदे गटाची सरशी राहणार आहे. अशात दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघावर भाजपा आणि शिंदे गटाकडून दावा केला जात आहे. येथे विद्यमान खासदार हे उबाठा सेनेचे अरविंद सावंत असल्याने शिंदे गटाकडून या जागेवर दावा केला जात आहे तर दुसरीकडे या मतदारसंघावर भाजपाचे वर्चस्व असल्या कारणाने भाजपाकडून तसे प्रयत्न केले जात आहेत. या मतदारसंघासाठी भाजपाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तसंच मंत्री मंगल प्रभात लोढा हे इच्छुक आहेत. तर शिंदे गटाकडून यशवंत जाधव यांचं नाव चर्चेत आहे.
'या' कारणानं घेतली राज ठाकरेंची भेट :यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव या भायखळा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत. अशा परिस्थितीमध्ये आज मंगल प्रभात लोढा यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीबद्दल मंगल प्रभात लोढा किंवा राज ठाकरे यांच्याकडून काहीही सांगण्यात आलेलं नाही. विशेष म्हणजे, राज ठाकरे यांनी मोदी यांना लोकसभा निवडणुकीसाठी बिनशर्थ पाठिंबा दिला असल्याकारणाने त्यांचे आभार मानण्यासाठी ही भेट घेतली असल्याचं सांगण्यात येत आहे. तरी देखील दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून आपण उभे राहिल्यास आपणाला पाठिंबा देण्यात यावा, याकरता मंगल प्रभात लोढा यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली असल्याचं समजत आहे.
असं आहे, विधानसभा मतदारसंघावरील वर्चस्व :दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात ६ विधानसभा मतदारसंघ येतात. यापैकी वरळीमध्ये उबाठा गटाचे आदित्य ठाकरे, त्याचबरोबर शिवडी येथे उबाठा गटाचे अजय चौधरी हे आमदार आहेत. तर मलबार हिल येथे भाजपाचे मंगल प्रभात लोढा, कुलाबा येथे भाजपाचे राहुल नार्वेकर हे विद्यमान आमदार आहेत. भायखळा विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाच्या यामिनी यशवंत जाधव या आमदार असून मुंबादेवी विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे अमीन पटेल हे आमदार आहेत. अशा प्रकारे भाजपाचे २, उबाठा गटाचे २, शिंदे गटाचा १ आणि काँग्रेसचा १ असे एकूण ६ आमदार दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघात आहेत.