मुंबई CM Eknath Shinde :राज्याच्या राजकारणात अडीच वर्षांपूर्वी सर्वात मोठा भूकंप झाला. एकनाथ शिंदे यांनी बंड करत भाजपासोबत सरकार स्थापन केलं. महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या या सत्तांतरानंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना फुटीची कथा आता रंगमंचावर येणार आहे. 'मला काही सांगायचंय' हे सव्वा तासाचं नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळं 'धर्मवीर' चित्रपटानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं 'मला काही सांगायचंय' हे नाटक कसं असणार? यात काय दाखवलं जाणार आहे? याची प्रेक्षकांना उत्सुकता लागलीय.
महाराष्ट्राचं राजकारण रंगमंचावर : 'मला काही सांगायचंय' या नाटकाचं दिग्दर्शन अशोक समेळ हे करणार असून, त्यांचे पुत्र आणि अभिनेता संग्राम समेळ एकनाथ शिंदेंच्या मुख्य भूमिकेत असणार आहेत. 31 ऑगस्ट रोजी एकनाथ शिंदे यांच्या आयुष्यावर आधारित 'कर्मयोगी' हे पुस्तक प्रकाशित झालं. यानंतर आता एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतून जे बंड केलं होतं, त्या बंडावर आधारित 'मला काही सांगायचंय' हे नाटक येणार आहे. 'मला काही सांगायचंय' हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती संग्राम समेळ यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना दिली. त्यामुळं आता महाराष्ट्राच्या राजकारणातील खेळी रंगमंचावर दिसणार आहेत.