मुंबई : विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. यानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले. मागील अडीच वर्षाच्या काळात महायुती सरकारनं अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबवल्या. यामुळंच महायुतीला जनतेनं कौल दिला असल्याचं राजकीय जाणकार आणि तज्ञ यांनी म्हटलंय. दरम्यान, महायुती सरकारनं अनेक योजना आणल्या होत्या. परंतु, त्यातील गेमचेंजर ठरलेल्या महत्त्वाच्या पाच योजना कोणत्या? हे बघूया.
1) मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना : निवडणुकीपूर्वी झालेल्या पावसाळी अधिवेशनात सरकारनं अनेक मोठे निर्णय घेतले. तसंच अनेक योजना जाहीर केल्या. नव मतदारांसाठी त्यातील महत्त्वाची योजना ठरली, ती म्हणजे 'मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना'. रोजगार संधी आणि युवांना प्रोत्साहन देणारी ही योजना तरुणांसाठी महत्त्वाची ठरली. या योजनेमुळं महायुती सरकारला एक नवमतदार वर्ग मिळाला. ही योजना तरुणांच्या पसंतीत उतरली. त्यामुळं कित्येक तरुणांनी मोठ्या प्रमाणात महायुतीला मतदान केलं असल्याचं बोललं जातंय. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत (इंटर्नशिप योजना) यामध्ये 5500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवता आला. या योजनेत बारावी पास, आयटीआय उमेदवार आणि पदवीदारांसाठी कमी जास्त प्रमाणात पगार देऊन इंटर्नशिप देण्यात आली. त्यामुळं ही योजना महायुतीसाठी फायदेशीर ठरली असल्याचं बोललं जातंय.
2) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या योजनेची घोषणा पावसाळी अधिवेशनादरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलेला प्रत्येक महिन्याला 1500 रुपये खात्यात जमा करण्यात आले. ही योजना गाव-खेड्यासाठी क्रांतिकारी योजना ठरली. सरकारी आकडेवारीनुसार 2 कोटी 74 लाख महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत. त्यातील 50% महिलांनी जरी महायुतीला मतदान केलं असेल तर ते कोटीच्या घरात जातं. त्यामुळं 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' ही योजना ऐतिहासिक आणि क्रांतिकारी योजना ठरली. दरम्यान, या योजनेला राज्यभरात अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. निवडणुकीपूर्वी या योजनेत 1500 रुपयांत वाढ करुन 2100 रुपये देण्याचं आश्वासन महायुतीनं दिलं होतं. आता पुन्हा एकदा महायुती सत्तेत आल्यामुळं आता लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहेत.