महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

"सरकारच्या विकासकामाला विरोधी आमदारांनीही मतं दिली"; निकालावर महायुतीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया - Vidhan Parishad Election Results - VIDHAN PARISHAD ELECTION RESULTS

Vidhan Parishad Election Results 2024 : राज्यातील विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शुक्रवारी निवडणूक झाली. यात महायुतीनं नऊ जागा जिंकल्या असून, महाविकास आघाडीनं दोन जागांवर विजय मिळवला. विजयानंतर आता महायुतीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदारांचे आभार मानले.

Mahayuti
महायुतीतील नेते (Etv Bharat MH Desk)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 12, 2024, 8:19 PM IST

Updated : Jul 12, 2024, 10:44 PM IST

मुंबई Vidhan Parishad Election Results 2024 : महाराष्ट्र विधान परिषद निवडणूकीत महायुतीनं नऊ जागांवर विजय मिळवलाय. त्यामुळं आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा विश्वास वाढल्याची प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. महायुतीनं दिलेले सर्व 9 उमेदवार विजयी झाले. महाविकास आघाडीचे 3 पैकी दोन उमेदवार विजयी झाले. काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांचा 26 मतांनी विजय झाला.

निकालावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर नेते (ETV Bharat Reporter)

इतर पक्षातील आमदारांनीही मत दिली : "महाविकास आघाडीची विकेट आम्ही घेतली आहे. महायुतीच्या विकासाला इतर पक्षातील आमदारांनी मत दिलं. ही एक सुरुवात असून, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या कामाची पोचपावती जनता देईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निकालानंतर दिली.

विरोधकांच्या विजयाची सूज उतरवली :"लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी एक मोठा नेरिटिव्ह तयार केला होता. संविधान बदलणार, लोकशाही धोक्यात आहे असा खोटा नेरिटिव्ह तयार करून त्यांनी विजय मिळवला होता. परंतु त्यांचा हा विजय जास्त काळ टिकला नाही. त्यांच्या जी विजयाची सूज होती ती आम्ही विधान परिषदेत विजय मिळवून उतरवली," असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला.

महायुतीच्या नेत्यांचं यश : महायुतीतील विजयानंतर नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. महायुतीतील नेत्यांनी एकत्र येऊन केलेलं नियोजन, तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळं महायुतीचा विजय झाला. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी हा विजय आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी दिली आहे. "महायुतीतील सर्व आमदारांनी नियोजनबद्ध पद्धतीनं मतदान केलं, मी त्यांचे आभार मानतो. महायुतीला मिळालेलं यश पुढील निवडणुकीसाठी नक्कीच आत्मविश्वास देईल," अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

विरोधकांना दाखवली जागा : राष्ट्रवादीच्या या विजयानंतर पक्षाचे खासदार सुनील तटकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. "अजित पवारांच्या नेतृत्वावर आमदारांनी शिक्कामोर्तब केला. लोकसभा निवडणुकीच्या निकालापेक्षा हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस आहे," असं तटकरे म्हणाले. "राष्ट्रवादीला एक जागा मिळेल, असं म्हणणाऱ्यांना आमदारांनी जागा दाखवली. आजच्या निकालानं मी खूप खूश आहे. आम्ही जिंकू असा विश्वास होता. आम्ही आमच्या गुणवत्तेवर जिंकतोय," असं ते म्हणाले.

महायुतीचं पारडं जड : विधान परिषदेसाठी 274 आमदारांचं मतदान चार वाजता पूर्ण झालं. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या परवानगीनं साडेसहाच्या सुमारास मतमोजणीला सुरुवात झाली. विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या फेरीत शिवसेना (उबाठा) पक्षाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर, भाजपाचे योगेश टिळेकर, काँग्रेसच्या प्रज्ञा सातव आघाडीवर होते. यावेळी भाजपाचे अमित गोरखे यांच्या मतपत्रिकेवर इंग्रजी क्रमांक चुकीचा लिहिण्यात आल्यानं वाद निर्माण झाला. मात्र, दुसऱ्या बॅलेट पेपरवर पहिल्या पसंतीचे मत दोन उमेदवारांना दिल्यानं हे मत फेटाळण्यात आलं.

पंकजा मुंडेंचा सन्यास संपला : भाजपाचे योगेश टिळेकर प्रथम विजयी झाले. त्यानंतर काही वेळातच भाजपाचे अमित गोरखे विजयी झाले. यानंतर सर्वांना ज्या निकालाची प्रतीक्षा होती, तो जाहीर झाला. गेली पाच वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर असलेल्या पंकजा मुंडे विजयी झाल्या. त्यामुळं पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा प्रवेश केला. याशिवाय भाजपाचे परिणय फुके, रयत क्रांती पक्षाचे सदाभाऊ खोत हेही विजयी झाले. त्यामुळं महायुतीच्या गोटात जल्लोषाचं वातावरण आहे.

हे वाचलंत का :

  1. विधानपरिषद निकाल : महायुतीचे सर्व उमेदवार विजयी; अकराव्या जागेसाठी मिलिंद नार्वेकर अन् जयंत पाटील यांच्यात चुरस - MLC ELECTION 2024
  2. "मोदींच्या काळातच आणीबाणी, विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रचार करणार"; ममता बॅनर्जींची घोषणा - Mamata Banerjee
  3. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मुंबई दौऱ्यावर, 'या' प्रकल्पांचं करणार भूमिपूजन - PM Modi Mumbai Visit
Last Updated : Jul 12, 2024, 10:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details