विजय शिवतारे यांची प्रतिक्रिया पुणेLok Sabha Elections : राज्यातील महायुतीत जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. काही ठिकाणी महायुतीतील नेत्यांमध्ये संघर्ष वाढत असल्याचं दिसून येत आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठवत बारामतीतून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. बारामतीची जागा अजित पवार यांना मिळण्याची शक्यता असल्यानं विजय शिवतारे यांनी बारामतीतून लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केलीय. यावरून महायुतीतील द्वंद उफाळून येत आहे.
'बारामती मतदारसंघात मतदार पवारांच्या विरोधात आहेत. ज्यांना पवारांना मतदान करायचं नाही, त्यांना लोकशाही अधिकार देण्यासाठी 'मी' बारामतीची निवडणूक लढवणार आहे. लोकांच्या आग्रहामुळं मला उभं राहावं लागतंय. पवार घराण्याला अनेकजण कंटाळले आहेत'- विजय शिवतारे
अजित पवार, विजय शिवतारे यांच्यात संघर्ष :देशभरात लोकसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. संपूर्ण राज्याचं नव्हे, तर देशाचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधातच शिवसेनेचे नेते विजय शिवतारेंनी शड्डू ठोकला आहे. यावरून अजित पवार तसंच विजय शिवतारे यांच्यात संघर्ष पाहायला मिळत आहे. आज देखील शिवतारे यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
थोपटे कुटुंबीयांची घेतली भेट :शिवसेना नेते माजी आमदार विजय शिवतारे यांनी आज भोर येथे जाऊन थोपटे कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यावेळी विजय शिवतारे म्हणाले की, आज अनंतराव थोपटे यांना भेटलो. त्यांना भेटल्यावर एक ऊर्जा मिळते. आज मी त्यांच्याशी सर्वच गोष्टींवर चर्चा देखील केली. अनंतराव थोपटे 1999 साली राज्याचे मुख्यमंत्री झाले असते. त्यावेळेस सोनिया गांधी यांनी भोरच्या सभेत सांगितलं देखील होतं. पण त्यावेळी कोणी अडचणीत आणलं, हे अख्या महाराष्ट्राला माहीत आहे. आज पवारांनी त्यांची भेट घेतली असली, तरी तेव्हा यांना पुण्यातील दुसरा कुठलाही माणूस मोठा होऊ द्यायचा नव्हता, असं यावेळी शिवतारे म्हणाले.
अजित पवारांनी दोन पिढ्याचं नुकसान केलं :'आमदार संग्राम थोपटे हे महाविकास आघाडीत पहिल्यांदाच मंत्री झाले असते. पण, त्यांना अडवण्यात आलं. याबाबत विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या वेळी काँग्रेसनं लेखी कळवलं होतं. तसंच पूर्ण तयारीही करण्यात आली होती. पण अजित पवारांनी तो निर्णय रोखला. अजित पवारांना पुण्यातील माणसाला सभापतीपदी बसवायचं नव्हतं. संतापाच्या भरात अजित पवार यांनी संग्राम थोपटे यांना विधानसभेचं अध्यक्षपद दिलं नाही. अजित पवारांनी दोन पिढ्याचं नुकसान केलंय. ही प्रवृत्ती गलिच्छ आहे. अशा प्रवृत्तींना राजकारणातून संपवलं पाहिजे. मी कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. आज दुसरा ब्रह्मराक्षस निर्माण करणं महाराष्ट्राच्या हिताचं नाही. बारामती लोकसभा मतदार संघातील जनतेवर 40 वर्षांपासून अन्याय होत आहे. पवार कुटुंबासह आम्ही घराणेशाहीच्या विरोधात आहोत', असं शिवतारे यांनी यावेळी सांगितलं.
हे वाचलंत का :
- Mahua Moitra Cash For Query Case : तृणमूल नेत्या महुआ मोईत्रांच्या अडचणी वाढल्या; लोकपालांनी दिले सीबीआय चौकशीचे आदेश
- Vijay Shivtare: शिवतारेंमुळं महायुतीत मिठाचा खडा? ...तर आम्ही शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करणार नाही, अजित दादांच्या कार्यकर्त्यांचा इशारा
- Sanjay Raut: राज ठाकरे यांच्या मनातील संवेदना मला अधिक माहिती, त्यांचे व्यंगचित्र बोलके - संजय राऊत