मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाकडून आचारसंहितेची घोषणा कधीही केली जाऊ शकते. याच कारणास्तव सोमवारी ७ ऑक्टोबरला मुंबईत तब्बल २५ हून अधिक योजनांच्या लोकार्पण आणि भूमिपूजनाचा सोहळा मुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे. विधानसभा निवडणुका घोषित होण्यापूर्वी अधिकाधिक विकासकामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करण्याचा चंग सरकारने बांधला असून, त्या दृष्टीने सरकार घाईघाईत असताना दिसत आहे.
रुग्णालयातील आयव्हीएफ केंद्राचे लोकार्पण :शुक्रवारी ५ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबईतील ३३ हजार कोटींच्या विकासकामांचा लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा संपन्न झाल्यानंतर दोनच दिवसांनी सोमवारी ७ ऑक्टोबर रोजी मुंबईतील विविध कामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे. यामध्ये जिल्हा नियोजन समिती अंतर्गत माहीम, भायखळा, शिवडी, शीव (सायन), नायगाव, वरळी येथील पोलीस वसाहतींचा लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा होणार आहे. तसेच वरळी येथील पोद्दार रुग्णालयाच्या आधुनिकीकरणाच्या कामाचे भूमिपूजन, कामगार कल्याण क्रीडा मंडळाच्या नूतनीकरण केलेल्या जलतरण तलावाचे लोकार्पण आणि जे जे रुग्णालयातील कॅथ लॅब यंत्रसामुग्री तसेच नूतनीकरण केलेल्या वॉर्डचे लोकार्पण, डोंगरी, उमरखाडी येथील बालसुधार गृह बांधकामाचे लोकार्पण, कामा रुग्णालयातील आयव्हीएफ केंद्राचे लोकार्पणसुद्धा केले जाणार आहे.
भागोजी कीर यांचे स्मारक उभारणार :दादर (पश्चिम) छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या परिसरामध्ये भागोजी कीर यांचे स्मारक उभारले जाणार आहे. याच परिसरामध्ये सायंकाळी ६ वाजता लोकार्पण व भूमिपूजनाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. महालक्ष्मी तसेच मुंबादेवी परिसरातील विकासकामांचे भूमिपूजन, जगन्नाथ शंकर शेठ यांच्या अँटॉप हीलमधील स्मारकाचे भूमिपूजन, बधवार पार्कमधील फूट ट्रॅकचे लोकार्पण, माहीम कोळीवाडा किनाऱ्यालगत असलेल्या पदपथ व संरक्षक भिंतीच्या सुशोभीकरणाच्या भूमिपूजनासह वरळीतील दुग्धशाळा आवारातील बांधकामांचे लोकार्पण आणि मुंबई सेंट्रल बसस्थानक येथे वाहन चालकांसाठी बांधण्यात आलेल्या कक्ष नूतनीकरणाचे लोकार्पण या कामांचासुद्धा यात समावेश आहे.
मुंबईतील ३ पिंक टॉयलेटचे लोकार्पण :मुंबई शहरात धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनाचे महत्त्व असलेल्या ठिकाणी 'आकांक्षी' नावे स्वच्छतागृहे बांधण्यात येणार आहेत. उच्च न्यायालयासमोरील के. बी. पाटील मार्ग, खाऊ गल्ली फॅशन स्ट्रीट, बाणगंगा वाळकेश्वर, विधान भवन, लायन गेट, माहीम रेतीबंदर या ठिकाणी ही स्वच्छतागृहे बांधण्यात येणार आहेत. त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेच्या १०३ शाळांमधील टेरेस गार्डन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कामाचे लोकार्पणसुद्धा करण्यात येणार आहे. यासोबतच फॅशन स्ट्रीट, ग्रँड रोड रेल्वे स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथील नगर चौकमधील पिंक टॉयलेटचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
हेही वाचाः