मुंबई -विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी पाहायला मिळत आहे. इच्छुक असणाऱ्यांना पक्षाने तिकीट नाकारल्यामुळं किंवा उमेदवारी डावलल्यामुळं राज्यातील कित्येक उमेदवारांनी बंडखोरीची भूमिका घेतलीय. या बंडखोरांनी पक्षाच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यामुळे जरी 4 नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची तारीख असली तरी आतापर्यंत सर्वच राजकीय पक्षांना बंडखोरीचे ग्रहण लागलंय. ऐन दिवाळीत या बंडोबांना थंडोबा करण्याचं महायुती आणि महाविकास आघाडी समोर मोठं आव्हान आहे. अर्ज मागे घेण्यासाठी चारच दिवस शिल्लक आहेत. यात दोन दिवस सुट्टीचे गेल्यामुळे दोन दिवसांत या बंडखोरांचे पक्षश्रेष्ठींकडून कशी मनधरणी केली जाते? किंवा त्यांची कशी काय समजूत काढली जाते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
ऐन दिवाळीत बंडोबांचे संकट : सध्या दिवाळीचा सण सुरू असला तरी निवडणुकीचाही माहोल आहे. 29 ऑक्टोबर अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती, तर 4 नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. जर बंडखोर उमेदवारांनी अर्ज मागे घेतले किंवा अपक्ष उमेदवारांनी भरलेले अर्ज माघारी घेतले, तर त्यानंतर कोणता उमेदवार कुठल्या उमेदवारासमोर उभे ठाकणार आहे, याचे चित्र स्पष्ट होईल. मात्र सध्या महायुतीतील शिवसेना (शिंदे गट), भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), मित्रपक्ष तसेच महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेस यांच्यात बंडखोरीची मोठं ग्रहण लागलंय. तसेच बंडखोरीचे ग्रहण कसे थोपवायचे हा त्या त्या पक्षातील नेत्यांसमोर खरा आणि मोठा प्रश्न आहे. ऐन दिवाळी सणाच्या सुट्टीत काही राजकीय पक्षातील नेते सुट्टीमुळे बाहेर फिरायला जातात. परंतु सध्या निवडणुकीचा माहोल आणि त्यातच बंडखोरांनी आपल्या बंडाचं हत्यार उपसल्यामुळे त्या बंडखोरांना शांत करण्यासाठी नेत्यांना त्यांची मनधरणी करावी लागतेय. परिणामी सुट्टीचा वेळ या बंडखोरांच्या मनधरणीसाठी जात असल्यामुळे बाहेर फिरायला जाण्याचा जो बेत नेत्यांनी आखला होता, तो ऐन दिवाळीत रद्द होताना पाहायला मिळत आहे. दुसरीकडे 1995 विधानसभा निवडणुकीत बंडखोरांची महत्त्वाची भूमिका ठरली होती. 50 पेक्षा अधिक उमेदवारांनी बंड केले होते आणि जिंकूनही आले होते. यानंतर त्या बंडखोरांनी शिवसेना आणि भाजपामध्ये प्रवेश करत सरकारमध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी बंडखोरांची भूमिका खूप महत्त्वाचे ठरली होती. 1995 विधानसभा निवडणुकीचा फॅक्टर 2024 विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळतो का? हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
थोडेफार यश येणार :सध्या महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अनेक उमेदवारांनी बंडखोरी केल्यामुळं एकाच विधानसभा जागेवर महायुतीतील आणि महाविकास आघाडीतून दोन-दोन अर्ज दाखल करण्यात आले आहेत. या निवडणुकीत बंडखोरीचे ग्रहण लागल्यानं पक्षश्रेष्ठींना बंडोबांना थंडोबा करण्यात यश येईल का? असा प्रश्न राजकीय विश्लेषक जयंत माईणकर यांना विचारला असता ते म्हणाले, "पाहा मुंबईतील बोरिवलीत गोपाळ शेट्टी यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांनी बंड केलंय. पण मुळात शेट्टी हे संघाचे आहेत. त्यांना शांत करण्यासाठी नक्कीच एखादा संघातील माणूस तिकडे जाईल आणि त्यांची समजूत काढेल किंवा त्यांना दुसऱ्या कुठल्या तरी पदाचे आमिष दाखवण्यात येईल. महायुतीत भाजपाला बऱ्यापैकी बंडखोरांना थंड करण्यात यश येईल. पण शिवसेना (शिंदे गट) आणि अजित पवार गटात जी बंडखोरी झालीय, त्याचा फटका मात्र भाजपाला बसू शकतो. कारण महायुतीतील भाजपा वगळता अन्य पक्षातील ज्यांनी बंड केलंय, ते शांत होतील, असं वाटत नाही, असं राजकीय विश्लेषक जयंत माईणकर यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना म्हटलंय." तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेस यातील जे बंडखोर आहेत, ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत, याचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो. पण पक्षश्रेष्ठी बंडखोरांची दुसऱ्या ठिकाणी वर्णी लावून त्यांची मनधरणी करतील, असेही दिसत आहे. त्यांना शांत करण्यात थोडेफार यश येऊ शकतं, असंही माईणकर यांनी म्हटलंय.
बंडोबांना थंडोबा करण्याचं दोन्ही आघाड्यांसमोर आव्हान, राज्यभरात कोणी अन् कुठं केली बंडखोरी?
ऐन दिवाळीत या बंडोबांना थंडोबा करण्याचं महायुती आणि महाविकास आघाडी समोर मोठं आव्हान आहे. अर्ज मागे घेण्यासाठी चारच दिवस शिल्लक आहेत.
Published : 4 hours ago
- मुंबईतील बोरिवलीत भाजपाचे गोपाळ शेट्टी यांना तिकीट न मिळाल्यामुळं त्यांनी बंड करत संजय उपाध्याय यांच्याविरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय.
- मुंबादेवी मतदारसंघात भाजपाच्या असलेल्या शायना एनसी यांनी शिंदे गटाकडून अर्ज दाखल केल्यानंतर भाजपाचे अतुल शहा यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय.
- शिंदे गटाच्या सदा सरवणकरांनी माहीममूधन दोन उमेदवारी अर्ज दाखल केलेत. त्यांनी माघार घ्यावी, यासाठी त्यांच्यावर दबाव आहे. येथूनच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे निवडणूक लढवत आहे.
- नांदगावमध्ये शिवसेना (शिंदे गट) उमेदवार सुहास कांदे यांच्याविरोधात छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय.
- माजी खासदार हिना गावित यांनी अक्कलकुवा मतदारसंघात बंडखोरी केलीय.
- पुण्यातील कसबा मतदारसंघात काँग्रेसच्या कमल व्यवहारे यांनी बंडखोरी केलीय.
- ठाण्यात कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात ठाकरे गटाकडून केदार दिघेंना उमेदवारी अर्ज दाखल केला असताना काँग्रेसच्या मनोज शिंदे यांनी बंडखोरी केलीय.
- पुसदमधून शरद पवार गटाचे ययाती नाईक यांनी बंडखोरी करत कारंजा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय.
- ऐरोलीत भाजपाचे गणेश नाईक यांच्याविरोधात शिंदे गटातील विजय चौघुले यांनी बंडखोरी केलीय.
- बेलापूरमध्ये भाजपाच्या मंदा म्हात्रे यांच्याविरोधात शिंदे गटाचे विजय नाहटा यांनी बंडखोरीचे हत्यार उगारलंय.
- कल्याणमध्ये भाजपाच्या सुलभा गायकवाड यांच्या विरोधात शिंदे गटाचे महेश गायकवाडांनी बंडखोरी केलीय.
- विक्रमगडमध्ये भाजपाचे हरिश्चंद्र भोये यांच्याविरोधात शिंदे गटाचे प्रकाश निकम यांनी बंडखोरी केलीय.
- फुलंबारीत शिंदे गटाचे रमेश पवार यांनी भाजपाच्या अनुराधा गायकवाड यांच्या विरोधात बंडखोरी केलीय.
- सोलापुरात भाजपाचे देवेंद्र कोठे यांच्याविरोधात मनीष काळजे यांनी बंडखोरी केलीय.
- पाचोरामध्ये शिंदे गटाचे किशोर पाटील यांच्याविरोधात भाजपाच्या अमोल शिंदेंनी बंडखोरी केलीय.
- बुलडाण्यात शिवसेना (शिंदे गटाचे) संजय गायकवाड यांच्याविरोधात भाजपाचे विजयराज शिंदे यांनी बंड करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय.
- ओवळा- माजिवडा येथे शिंदेंच्या प्रताप सरनाईक यांच्याविरोधात भाजपाचे हसमुख गेहलोत यांनी बंडखोरी केलीय.
- पैठणमध्ये भाजपाचे सुनील शिंदेंनी शिवसेना (शिंदे गटाच्या) विलास भुमरेंविरोधात बंडखोरी केलीय.
- जालन्यात शिंदे गटाचे अर्जुन खोतकर यांच्याविरोधात भाजपाचे भास्कर दानवेंनी बंड केलंय
- सिल्लोडमध्ये शिंदे गटाचे अब्दुल सत्तारांना भाजपाचे सुनील मिरकर यांच्यात सामना करावा लागणार आहे.
- सावंतवाडीत भाजपाचे विशाल परब यांनी मंत्री शिवसेनेचे दीपक केसरकरांविरोधात बंड पुकारलेय.
- कळवणमध्ये महायुतीचे नितीन पवार यांच्या विरोधात भाजपाचे रमेश थोरात यांनी बंड केलंय.
- कर्जतमध्ये भाजपाच्या किरण ठाकरे विरुद्ध शिंदे गटाचे महेंद्र थोरवे असा सामना रंगणार आहे.
- अमळनेरमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार) अनिल पाटील यांच्याविरोधात भाजपाचे शिरीष चौधरी यांनी बंड पुकारलंय.
- अमरावती मतदारसंघात भाजपाचे जगदीश गुप्ता विरुद्ध अजित पवार गटाच्या सुलभा खोडके यांच्यात सामना होईल.
- जुन्नरमध्ये भाजपाच्या आशा बुचके आणि अतुल बुचके यांच्यात लढत होणार आहे.
- उदगीरमध्ये संजय बनसोडे यांच्याविरोधात भाजपाचे दिलीप गायकवाड यांनी बंड पुकारलंय.
- अजित पवार गटाचे धर्मराव आत्राम यांच्या विरोधात भाजपाचे अंबरिश आत्राम यांनी बंडाचं अस्त्र उगारलंय.
- मुलुंड मतदारसंघात महाविकास आघाडीतून शरद पवार गट आणि काँग्रेसने अर्ज दाखल केल्यामुळं येथे बंड मविआत बंड पाहायला मिळतंय.
- मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघातून अजित पवार गटाचे आमदार तथा माजी मंत्री नवाब मलिक यांनी अर्ज दाखल केलाय, तर दुसरीकडे शिंदे गटाचे सुरेश पाटील यांना महायुतीतून उमेदवारी देण्यात आलेय, मलिकांचा प्रचार करणार नसल्याचं भाजपानं म्हटलं आहे.
हेही वाचा -