महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुढील 24 तासांत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी - Maharashtra Weather Forecast - MAHARASHTRA WEATHER FORECAST

Maharashtra Weather Update : मान्सूनच्या सक्रियतेमुळं महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाला सुरुवात झालीये. याच पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी हवामान खात्यानं यलो अलर्ट जारी केला असून पुढील 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

MAHARASHTRA WEATHER FORECAST
राज्यात मुसळधार पावसाची शक्यता (Source ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 6, 2024, 10:27 AM IST

मुंबई Maharashtra Weather Update : मागील 24 तासात पुन्हा एकदा राज्यात पाऊस सक्रिय झाला असून, बळीराजा पुन्हा एकदा शेतीच्या कामाला लागल्याचं पाहायला मिळतंय. अशातच आता हवामानशास्त्र विभागानं पुढील 24 तासाचा पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार पुढील 24 तासात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.

राज्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता : भारतीय हवामानशास्त्राच्या मुंबई विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे आणि कोल्हापूर परिसरातही मुसळधार पाऊस ते अतिवृष्टी होऊ शकते. चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. जुलै महिन्यात सरासरीपेक्षा 106 टक्के अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भाग वगळता उर्वरित राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल, असंही हवामानशास्त्र विभागानं म्हटलंय.

मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता : भारतीय हवामानशास्त्र विभागाचे मुंबई विभागातील वरिष्ठ शास्त्रज्ञ सुनील कांबळे यांनी सांगितलं की, "पुढील 24 तासात मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळं आम्ही मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केलाय. सोबतच मुंबईत पुढचे 2 ते 3 दिवस हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट आणि यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. तर, घाट भागात मुसळधार पावसाची शक्यता असून पुढील तीन दिवस मराठवाड्यातील विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे."

नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी : पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात तसंच दक्षिण नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, दिंडोरी, निफाड, येवला, नांदगाव, चांदवड या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू राहणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय. 5 जुलै ते 10 जुलै दरम्यान राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि मुसळधार पाऊस होऊ शकतो. त्यामुळं नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहनही हवामानशास्त्र विभागाकडून करण्यात आलंय.

ABOUT THE AUTHOR

...view details