नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे सुरू असलेल्या हिवाळी सत्र परीक्षेतील पेपर फुटल्याचा मेसेज विद्यापीठाच्या मेलवर आला. पेपरफुटीसंदर्भात मेल आल्यानंतर विद्यार्थ्यांना त्वरित दुसरी प्रश्नपत्रिका पाठवण्यात आली, यामुळं विद्यार्थ्यांना परीक्षेला विलंब झाला होता. याप्रकरणी आरोपीला लवकरच ताब्यात घेतलं जाईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून एमबीबीएसच्या हिवाळी सत्र परीक्षा सुरू आहेत. एमबीबीएस द्वितीय वर्षाचा फार्माकोलॉजी 1 विषयाचा पेपर 2 डिसेंबरला फुटल्यानंतर ती परीक्षा रद्द करण्यात आली होती. अशातच बुधवारी 4 डिसेंबरला पेपरच्या दिवशी पेपर फुटीची पुनरावृत्ती झाल्याची अफवा पसरल्यानं प्रश्नपत्रिका बदलण्यात आली. मात्र, तिसऱ्या दिवशीची घटना केवळ अफवा असून खबरदारी म्हणून प्रश्नपत्रिका बदलण्यात आल्याची माहिती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी दिली. परंतु त्यानंतर सोमवारी 9 डिसेंबरला पॅथॉलॉजी 2 या विषयाच्या प्रश्नपत्रिकेतही तशाच घटनेची पुनरावृत्ती झाल्यानं पुन्हा एकदा नवीन प्रश्नपत्रिका पाठवण्याची नामुष्की विद्यापीठावर ओढवली आहे.
चौकशी समिती नेमली : कुठल्याही महाविद्यालयात प्रश्नपत्रिका पाठवल्यानंतर त्या महाविद्यालयाचे प्राचार्य कॅमेऱ्यासमोर आणि चार प्राध्यापकांसमोर त्या सीलबंद प्रश्नपत्रिका उघडतात. त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेचं वाटप केलं जातं. अशात एमबीबीएस पेपरफुटी प्रकरणी विद्यापीठानं चौकशीसाठी विद्यापीठस्तरीय समिती नेमली आहे. तसंच सर्व केंद्रावरील सीसीटीव्हीचे फुटेज विद्यापीठानं तात्काळ जमा करून ताब्यात घेतले असून त्याची तपासणी सुरू आहे.