मुंबई Maharashtra Weather Forecast : गेल्या काही दिवसांपासून दांडी मारलेल्या पावसानं महाराष्ट्रात पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. मुंबईसह महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता अनेक ठिकाणी गुरुवारी (26 सप्टेंबर) शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मुंबईसह, ठाणे, पुणे आणि पिंपरी-चिंडवड परिसरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय. अतिमुसळधार पावसामुळं विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता प्रशासनानं हा निर्णय घेतलाय.
मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर :भारतीय हवामान विभागाकडून मुंबई महानगराला आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. त्यामुळं शाळा-महाविद्यालयांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसंच आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावं, असं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आलंय.
पुणे, पिंपरी चिंचवडमधील शाळांनाही सुट्टी :भारतीय हवामान विभागानं पुण्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील शाळा, महाविद्यालयांनादेखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केलेत.
'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट :कोकणातील रायगड, पालघर जिल्ह्यातही आज रेड अलर्ट जारी करण्यात आला असून मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर रायगड, नंदुरबार, नाशिक, धुळे, पुणे जिल्ह्यात जोरदार पावसामुळं दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, आणि उत्तर मराठवाड्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाचा, तर विदर्भात विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय. तसंच बीड, परभणी, बुलढाणा, हिंगोली, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्येही विजांसह वादळी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, कोल्हापूर, नगर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालन्यामध्येही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय.
हेही वाचा -
- मुंबईसह ठाण्यात हवामान विभागाचा आज ऑरेंज अलर्ट, राज्यात हवामानाची कशी स्थिती राहिल? - Maharashtra weather forecast
- मुसळधार पावसामुळे मुंबई विमानतळावरील उड्डाणे रद्द; एअर इंडियाच्या तिकिटाचे पैसे परत मिळणार? - Air India news
- पावसाच्या जोरदार बॅटींगमुळं बीएमसी प्रशासन 'आऊट'; पुन्हा एकदा मुंबईची 'तुंबई' - mumbai rain