Maharashtra Rain Update : राज्यात मान्सून दाखल झाला असून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढलाय. ठिकठिकाणी पावसानं थैमान घातलंय. मुंबईत पहाटे 4:00 वाजल्यापासून पावसानं हजेरी लावलीय. हवामान विभागानकडुन मुंबईत शहराला यलो अलर्ट जाहीर करण्यात आलाय. मुंबईतील अंधेरी परिसरात रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबईतील दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी अशा अनेक भागात मुसळधार पाऊस झालाय. पावसाच्या आगमनामुळं शहरातील नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळालाय.
या भागांत पावसाची शक्यता :कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटक, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर किनारपट्टीवर हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवसांत आंध्र प्रदेश, रायलसीमा, तेलंगणा, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानकडून वर्तवण्यात आलीय. नैऋत्य मान्सून शनिवारी मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, दक्षिण महाराष्ट्र, तेलंगणा आणि दक्षिण छत्तीसगड, दक्षिण ओडिशा आणि किनारी आंध्र प्रदेशच्या काही भागांमध्ये पोहोचलाय. नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्राच्या उर्वरित भागात, महाराष्ट्राच्या आणखी काही भागांमध्ये मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झालीय.