छत्रपती संभाजीनगर Maharashtra Police Recruitment : राज्यात जवळपास 17 हजार 471 जागांसाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी आपापल्या भागात युवकांनी मोठ्या प्रमाणात अर्ज केल्याचं पाहायला मिळालं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 754 जागांसाठी जवळपास एक लाख अर्ज आल्याची माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात उच्चशिक्षित युवकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सरकारी नोकर भरती होत नसून, शिक्षणाच्या मानानं तोलामोलाची नोकरी मिळत नसल्यानं दहावी उत्तीर्ण इतकी शैक्षणिक पात्रता असलेल्या पोलीस भरतीसाठी उच्चशिक्षित येऊ इच्छित असल्याचं यानिमित्तानं पाहायला मिळालं.
राज्यात पोलीस भरती सुरू : मोठ्या प्रतीक्षेनंतर राज्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. अनेक पदं रिक्त होती. त्यामुळं लवकरात लवकर भरती करण्याची मागणी केली जात असताना राज्यात रिक्त असलेल्या 17 हजार 471 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. सकाळी सहा वाजल्यापासून शारीरिक तपासणी चाचणी सुरू करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरमध्ये 754 जागांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. यात शहर, ग्रामीण, रेल्वे आणि कारागृह शिपाई पदासाठी आजपासून मैदानी चाचणी सुरू झाली आहे. 754 जागेसाठी तब्बल 97 हजार 835 उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून सरकारी नोकरीच्या आशेनं उच्चशिक्षित तरुण देखील या भरतीत आपलं नशीब आजमावून पाहात आहेत. ग्रामीण पोलीस विभागासाठी 147 जागांसाठी भरती होत आहे, त्यात उच्चशिक्षित उमेदवारांमध्ये अभियंता - 16, डी फार्मसी - 8, एम.बी.ए - 5, एम.सी.ए - 2, एम.कॉम - 9, बी.सी.ए. आणि बी.बी.ए - 5, एम.ए - 24, पदवीधर - 270 उमेदवारांचा समावेश आहे. ही भरती प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी मैदानावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह स्वतंत्र कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण होणार असून जर पावसामुळं मैदानी चाचणी झाली नाही तर उमेदवारांना पुढची तारीख आणि वेळ दिला जाईल. त्यामुळं कोणीही भरती प्रक्रियेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेत असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय.