मुंबई- विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळविणाऱ्या भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची आज बैठक सुरू आहे. या बैठकीत भाजपाचा पक्षनेता निवडला जाणार आहे. भाजपाच्या परंपरेनुसार निवड प्रक्रिया होणार असल्याचं गुजरातचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपाचे पक्षनिरीक्षक विजय रुपाणी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
Live Updates
- भाजपा विधीमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी, महाराष्ट्र भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा किशोर वाघ म्हणाल्या, "महाराष्ट्र महिलांच्या लाडक्या भावाचे नाव आज कधीतरी येणार आहे. आम्ही सर्व बहिणी खूप आनंदी आहोत". बैठकीपूर्वी आमदार रवी राणा यांनी म्हटलं, " महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि भविष्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची गरज आहे. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, अशी महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे."
- भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीसाठी भाजपाचे पक्षनिरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन विधानभवनमध्ये हजर आहेत.
भाजपच्या महाराष्ट्र विधीमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी गुजरातचे माजी मुख्यमंत्रीविजय रुपाणीआणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन पक्ष निरीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत. हे दोन्ही नेते मुंबईत मंगळवारी दाखल झाले. भाजपा नेते रुपाणी म्हणाले, " पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांशी बुधवारी (4 डिसेंबर) चर्चा केल्यानंतर विधिमंडळ पक्षनेत्याचं नाव निश्चित केले जाईल. एकमतानं हे नाव निश्चित केले जाणार आहे. भाजपाच्या विधिमंडळ पक्षनेत्याची निवड करण्याची प्रक्रिया पक्षांतर्गत परंपरेनुसार होते. त्याप्रमाणं पक्षनेत्याचं नाव निश्चित करण्याचा हा आमचा मार्ग आहे. विधिमंडळ पक्षनेता दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेईल".
- निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी हे दोन्ही नेते विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजपा आमदारांची सकाळी भेट घेणार आहेत.
- विधानसभा निवडणुकीत 288 पैकी 132 जागा मिळवणाऱ्या भाजपाचाच मुख्यमंत्री असणार आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव सर्वप्रथम आहे.
- काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या निर्णयाला पाठिंबा असल्याचं यापूर्वीच जाहीर केलं आहे. मात्र, कोणती जबाबदारी घेणार हे अद्याप जाहीर केलेलं नाही.
- 5 डिसेंबरला मंत्रिपदासाठी दक्षिण मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधी सोहळा होणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री, भाजपाची सत्ता असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.