नागपूर-मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केलीय. त्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं. विधानसभा निवडणुकीतून मनोज जरांगे यांनी माघार घेतल्याचं मला कळलं. त्यांनी हा निर्णय घेण्यामागील काय कारणं आहेत, याची माहिती घेतल्याशिवाय त्यावर बोलणे योग्य नसल्याचं मत संभाजीराजे छत्रपतींनी व्यक्त केलंय. ते आज नागपूर येथे बोलत होते.
घाईगडबडीने ते निर्णय घेत नाहीत: मनोज जरांगे पाटील यांनी आजवर मराठा समाजाच्याच हितासाठी भूमिका घेतली आहे. त्यांनी निश्चितच विचार करूनच निर्णय केला असेल, असंही ते म्हणालेत. आम्ही लवकर त्यांना भेटू आणि सविस्तर चर्चा करू. तसेच त्यांनी असा निर्णय का घेतला समजून घेऊ. मराठा समाजासाठी हितकारक निर्णयच आजवर ते घेत आले आहेत. घाई गडबडीने ते निर्णय घेत नाहीत. माझी ओळख त्यांच्यासोबत आजची नाही तर अनेक वर्षांपासून मी त्यांना ओळखत असल्याचंही संभाजीराजेंनी अधोरेखित केलंय.
मनोज जरांगेंची भेट घेणार- संभाजीराजे : एका समाजाच्या भरवश्यावर निवडणुका लढवणं शक्य नाही, असा त्यांचा विचार असून तो योग्यचं आहे. मला अजिबात वाटत नाही की, त्यांच्यावर कुठला दबाव आला असेल आणि ते त्यात अडकले असतील. ते परखड भूमिका आजवर मांडत आलेत. मनोज जरांगे पाटील यांनी आताच माघार घेतली बोलणं हा शब्दप्रयोग चुकीचा आहे. समाजासाठी काय हिताचे आहे, त्यानुसार त्यांनी निर्णय घेतला असावा. लवकर आम्ही त्यांना भेटू, असंही संभाजीराजे म्हणालेत.
जरांगेंनी परिवर्तन महाशक्तीला मदत करावी- शेट्टी :मनोज जरांगे यांची भूमिका होती की विधानसभेत आपला माणूस गेला पाहिजे, विधानसभेत प्रतिनिधी गेल्याशिवाय समाजाची भूमिका मांडता येत नाही. एखादं आंदोलन दीड वर्ष टिकून आहे, ते सोपं काम नाही. मनोज जरांगे यांच्याकडे जे लोक गेले, ते स्वार्थासाठी गेले होते, फक्त परिवर्तन महाशक्ती तशी नव्हती. त्यामुळे त्यांनी आम्हाला मदत करावी, अशी अपेक्षा होती. आमचं आयुष्यचं चळवळीत गेलंय, त्यामुळे चळवळीतील लोकांनी एकत्र येऊन एकमेकांना साथ दिली पाहिजे, असं आमचं मत होतं. त्यामुळे मनोज जरांगे यांनी चळवळीतील लोकांना मदत करावी, अशी अपेक्षा ठेवून दोन दिवसांपूर्वी मी त्यांना भेटलो होतो. तेव्हा त्यांनी विचार करून सांगतो, असं सांगितलं होतं. आता पाहू ते पुढचा निर्णय काय घेतात, असं राजू शेट्टी म्हणालेत. परिवर्तन शक्तीच्या उमेदवारांची अंतिम यादी आज आम्ही जाहीर करणार आहोत. त्याच्या अनुषंगाने आज आमची विदर्भात बैठक असल्याचीही माहिती राजू शेट्टी यांनी दिलीय.
हेही वाचा-
- महाविकास आघाडी सरकार हप्ते वसुली सरकार - मुख्यमंत्र्यांची टीका, शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ फुटला
- बंडखोरीमुळं भाजपाची वाढली डोकेदुखी; अकोला पश्चिममध्ये बंडोबांना शांत करण्याचे प्रयत्न