महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गायकवाडांच्या नेतृत्वात धारावीत काँग्रेसचा दबदबा कायम राहणार का? गणित समजून घ्या...

धारावीच्या राजकीय इतिहासात काँग्रेस आणि शिवसेनेने आपले उमेदवार निवडून आणत ताकद दाखवलीय. खरं तर इथे दोन्ही पक्षांनी वेळोवेळी आपली ताकद सिद्ध केलीय.

Jyoti Gaikwad and Varsha Gaikwad
ज्योती गायकवाड आणि वर्षा गायकवाड (ETV Bharat File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 5, 2024, 4:23 PM IST

मुंबई- विधानसभा निवडणुकीतील धारावीची जागा ही मुंबई शहर जिल्ह्यातील दहा प्रमुख मतदारसंघांपैकी एक आहे. धारावी मतदारसंघाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीचा समावेश आहे, जी सामाजिक, राजकीय आणि आर्थिक दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाची आहे. धारावीच्या राजकीय इतिहासात काँग्रेस आणि शिवसेनेने आपले उमेदवार निवडून आणत ताकद दाखवलीय. खरं तर इथे दोन्ही पक्षांनी वेळोवेळी आपली ताकद सिद्ध केलीय.

वर्षा गायकवाड यांचे नेतृत्व काँग्रेससाठी महत्त्वाचे: राज्यात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका होताहेत. राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून, त्यानंतर 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या निवडणुकीत धारावीच्या जागेवर पुन्हा कडवी लढत पाहायला मिळणार आहे. वर्षा गायकवाड यांचे नेतृत्व काँग्रेससाठी महत्त्वाचे असून, धारावीतील लोकांमध्ये त्यांची मजबूत पकड आहे. मात्र, धारावीत शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपा युतीची रणनीतीही महत्त्वाची भूमिका बजावू शकते.

सुरुवातीचा काळ अन् काँग्रेसचा उदय :धारावी विधानसभेची जागा भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सीपीआय)चे सत्येंद्र मोरे यांनी 1978 मध्ये जिंकली होती, तेव्हा डाव्या पक्षांची या मतदारसंघावर मजबूत पकड होती. 1980 च्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) च्या प्रेमानंद आवळे यांनी या मतदारसंघात विजय मिळवला होता. त्यामुळे धारावीत काँग्रेस पक्ष आणखी मजबूत झाला. एकनाथ गायकवाड (INC) यांनी 1985 आणि 1990 मध्ये सलग निवडणुका जिंकून धारावी हा काँग्रेसचा बालेकिल्ला बनवला. एकनाथ गायकवाड हे धारावीतील लोकांमध्ये लोकप्रिय नेते मानले जात होते.

शिवसेनेने जागा कशी निर्माण केली?:1995 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या बाबुराव माने यांनी काँग्रेसला कडवी टक्कर देत ही जागा जिंकली. हा तो काळ होता, जेव्हा मुंबईत शिवसेनेचा प्रभाव झपाट्याने वाढत होता आणि धारावीही त्यातून सुटलेला नव्हता. शिवसेनेने येथे आपला पाया मजबूत केला आणि सोबतच मराठी मतदारांमध्येही आपली पकड निर्माण केली.

गायकवाड घराण्याचे वर्चस्व:1999 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने पुनरागमन केले आणि एकनाथ गायकवाड विजयी झाले. त्यानंतर त्यांची कन्या वर्षा गायकवाड यांनी 2004, 2009, 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसचे प्रतिनिधित्व केले आणि सलग चार वेळा या मतदारसंघांतून विजय मिळवला. वर्षा गायकवाड यासुद्धा धारावीतील लोकांमध्ये लोकप्रिय आहेत. वर्षा गायकवाड यांनीही शैक्षणिक आणि सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रात अनेक प्रयत्न केले, त्यामुळे त्यांना धारावीत मोठा पाठिंबा मिळाला.

ज्योती गायकवाड धारावीच्या रिंगणात:2019 च्या विधानसभा निवडणुकीत वर्षा गायकवाड 53 हजार 954 मतं मिळाली होती, तर शिवसेनेच्या आशिष मोरे यांना 42,130 मतांवर समाधान मानावं लागलं होतं, तर आंबेडकरी विचारांचे दिवंगत नेते मनोज संसारे यांना 13000 मतं मिळाली होती. परंतु यंदा विधानसभा निवडणूक 2024 मध्ये उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांची बहीण ज्योती गायकवाड धारावी मतदारसंघातून आपलं नशीब आजमावत आहे. काँग्रेसच्या ज्योती गायकवाड यांचा सामना शिंदेंच्या शिवसेनेचे राजेश शिवदास खंदारे यांच्याशी होणार आहे. तसेच या मतदारसंघातून बहुजन समाज पार्टीचे मनोहर केदारी रायबागेसुद्धा उभे आहेत. त्यामुळे धारावीत कोण विजय मिळवतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल
उमेदवार पक्ष मिळालेली मतं
वर्षा गायकवाड काँग्रेस 53,954
आशिष मोरे शिवसेना 42,130
मनोज संसारे एमआयएम 13,099
2014 च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल
उमेदवार पक्ष मिळालेली मतं
वर्षा गायकवाड काँग्रेस 47,718
बाबूराव माने शिवसेना 32,390
दिव्या ढोले भाजपा 20,763
2009 च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल
उमेदवार पक्ष मिळालेली मतं
वर्षा गायकवाड काँग्रेस 52,492
मनोहर रायबागे शिवसेना 42,783
विष्णू गायकवाड बहुजन समाज पार्टी 7,269

हेही वाचा -

  1. अर्ज मागे घेण्याची मुदत संपली; बीड विधानसभा मतदारसंघातून कोणी घेतली माघार? पाहा लिस्ट
  2. राज्यात कुठल्या बंडखोरांनी मागे घेतले अर्ज? तर, कोण निवडणूक लढवण्यावर ठाम? वाचा सविस्तर

ABOUT THE AUTHOR

...view details