मुंबई -विधानसभा निवडणुकांचा राजकीय आखाडा तयार झालाय. यात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांविरोधात ठाकले असून, मुंबईत वरळी आणि माहीम विधानसभा मतदारसंघात नेमका काय निकाल लागतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. माहीम विधानसभा मतदारसंघात राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. या जागेवर अमित ठाकरे बिनविरोध निवडून यावेत, यासाठी महायुतीत अंतर्गत वाद सुरू असल्याच्या चर्चा आहेत. अशा अन्य जागा देखील आहेत, जिथे महायुतीचे उमेदवार बंडखोरी करून एकमेकांविरोधात उभे राहिलेले दिसतात. मात्र, त्याला मुंबईतील एक मतदारसंघ अपवाद असून, येथे मनसे उमेदवाराविरोधात महायुतीने एकही उमेदवार दिलेला नाही आणि तो विधानसभा मतदारसंघ म्हणजे शिवडी विधानसभा आहे. एकूणच या परिस्थितीसंदर्भात मनसे नेते बाळा नांदगावकर यांची आमचे प्रतिनिधी कौस्तुभ खातू यांनी मुलाखत घेतलीय.
शिवडीत महायुतीचा उमेदवार नाही :मुंबईतील बहुतांश विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. मात्र, शिवडी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अजय चौधरी विरुद्ध महाराष्ट्र निर्माण सेनेचे उमेदवार बाळा नांदगावकर अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे. शिवडी विधानसभा मतदारसंघातून महायुतीतील कोणत्याही घटक पक्षाने उमेदवार दिलेला नाही. या जागेवर ठाकरे घराण्याचे वर्चस्व मानले जाते. उद्धव ठाकरेंसोबतच राज ठाकरे यांचीही येथे चांगली पकड आहे. अशा परिस्थितीत यंदा महायुतीने राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय.
ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीनं बाळा नांदगावकर यांच्याशी संवाद साधला (Source - ETV Bharat Reporter) माझे सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध- नांदगावकर : एका बाजूला माहीममध्ये अमित ठाकरे यांची लढत मैत्रीपूर्ण व्हावी, यासाठी महायुतीमध्ये वाद होत असल्याचा चर्चा सुरू असतानाच शिवडी विधानसभेत मात्र महायुतीने आपला एकही उमेदवार दिलेला नाही. यामागे नेमकं काय कारण आहे? हे जाणून घेण्यासाठी ईटीव्ही भारतची टीमने थेट बाळा नांदगावकर यांच्याशी संपर्क साधला आणि या विधानसभा निवडणुकीबाबत त्यांच्याशी चर्चा केली. ईटीव्ही भारतला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये बोलताना बाळा नांदगावकर अनेक मुद्द्यांवर भाष्य केलंय. मी अशी कोणतीही जादूची कांडी फिरवलेली नाही. माझे सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यातूनच कदाचित महायुतीने येथे उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला असावा," असंही नांदगावकर म्हणालेत.
शिंदे हे त्यांच्या स्वकर्तृत्वाने मोठे झालेले नेते- नांदगावकर: पुढे बोलताना नांदगावकर म्हणाले की, "माध्यमांमध्ये यासंदर्भात अनेक बातम्या माझ्या कानावर आल्यात. पण बातम्यांमध्ये ज्या घटनेचा संदर्भ दिला गेलाय, तसं काहीही झालेलं नाही. एकनाथ शिंदे हे त्यांच्या स्वकर्तृत्वाने आणि मेहनतीने मोठे नेते झालेत. जेव्हा आनंद दिघे यांचा अपघात झाला होता आणि ते आजारी होते, त्यावेळी बाळासाहेबांनी मला ठाण्यात पाठवलं होतं. मी बाळासाहेबांचा एक दूत म्हणून ठाण्यात गेलो होतो. त्यावेळी बाळासाहेबांच्या आदेशाने एकनाथ शिंदे यांना पदावर घेतले गेले. त्यांनी जुन्या उपकाराची परतफेड केली वगैरे असं काहीही झालेलं नाही. मुळात तसे बाळासाहेबांचे आदेश होते आणि मी त्या देशांचं पालन केलं होतं," असंही बाळा नांदगावकर म्हणालेत.
मनसे अन् शिवसेना एकत्र येण्यासाठी नांदगावकर प्रयत्नशील: मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे काँग्रेस आणि भाजपाप्रमाणेच एकमेकांचे कट्टर शत्रू पक्ष मानले जातात. मात्र, दोन्ही पक्षांनी एकत्र यावं, यासाठी बाळा नांदगावकर यांनी अनेकदा प्रयत्न केलेत. बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावांना एकत्र आणण्याचे प्रयत्न केले होते. सुरुवातीला 2009 मध्ये मग 2014 ला आणि त्यानंतर 2019 या तिन्ही निवडणुकांच्या काळात नांदगावकर यांनी दोन्ही भावांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केल्याचं बोललं जातंय. राज ठाकरे यांचे खंदे आणि कट्टर समर्थक असलेले बाळा नांदगावकर या दोन्ही भावांना एकत्र आणण्यासाठी का प्रयत्न करतात? असं अनेकदा बोललं जातं. हाच प्रश्न आम्ही त्यांना विचारला असता ते म्हणाले की, "मी आज जो काही आहे तो ठाकरे परिवारामुळे. मला बाळासाहेब ठाकरे यांनी राजकारणात आणलं. त्यांनी मला मोठं केलं. त्यामुळे या परिवाराशी माझे घट्ट नातं आहे. या परिवाराचा मी काही तरी देणं लागतो. हे दोन्ही बंधू एकत्र यावेत, असं आजही मला वाटतं. मात्र, ती वेळ आता निघून गेलीय. आता नवीन पिढी राजकारणात आलीय. या नव्या पिढीचे नवे विचार आहेत. त्यांच्या पद्धती वेगळ्या आहेत. त्यामुळे आता हे दोन्ही भाऊ एकत्र येणे शक्य होईल, असं मला वाटत नाही," अशी प्रतिक्रियाही बाळा नांदगावकर यांनी दिलीय.
माझी तत्त्वं मी नेहमीच पाळतो- नांदगावकर:राजकारणात अनेक नेते वादाच्या भोवऱ्यात सापडलेले दिसतात. मात्र, यात बाळा नांदगावकर हे नाव कुठेही दिसत नाही. या संदर्भात आम्ही त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, मागील साधारण 40 ते 45 वर्षांपासून राजकारणात आहे. माझ्या या संपूर्ण राजकीय जीवनात मी काही तत्त्व कायम पाळत आलोय. ती म्हणजे कोणाच्याही परिवारावर टीका करायची नाही. कोणाच्याही भावना दुखावतील, मन दुखावेल, अशी टीका करायची नाही. वैयक्तिक टीका करायची नाही आणि कमरेखालची भाषा वापरायची नाही. ही माझी तत्त्वं आहेत आणि ती मी नेहमी पाळतो. याच सवयीमुळे माझे राजकारणात अनेक मित्र आहेत. अगदी माझ्या विरोधात निवडणूक लढवणारे अजय चौधरीदेखील माझे मित्र आहेत, असंही बाळा नांदगावकर सांगतात.
अजय चौधरी मागील दोन टर्म इथे आमदार: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने शिवडी विधानसभा मतदारसंघातून आमदार अजय चौधरी यांना पुन्हा एकदा तिकीट दिलंय. अजय चौधरी मागील दोन टर्म इथे आमदार आहेत. या जागेवर अजय चौधरी आणि बाळा नांदगावकर या दोन्ही उमेदवारांची चांगलीच पकड असल्याचं बोललं जातंय. 2014 मध्येही याच दोघांमध्ये मुख्य लढत झाली होती, ज्यात अजय चौधरी यांचा विजय झाला होता. 2009 मध्ये शिवडी विधानसभा मतदारसंघातून बाळा नांदगावकर मनसेच्या तिकिटावर विजयी झाले होते. त्यांनी शिवसेनेच्या दगडू सकपाळ यांचा 6,463 मतांनी पराभव केला होता. पण 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने अजय चौधरी यांना उमेदवारी दिली आणि त्यावेळी बाळा नांदगावकरांना पराभवाला सामोरे जावे लागले. आता पुन्हा एकदा पक्षाने उमेदवारी दिल्याने चौधरी यांच्या विरोधात बाळा नांदगावकर उभे असून, शिवडीतून कोण जिंकतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
हेही वाचा -
- भाजपाचा मुख्यमंत्री अन् मनसे सत्तेत असेल, राज ठाकरे आताच असं का म्हणाले?
- मतदारसंघ 21 आणि उमेदवार 1272, 'या' मतदारसंघात तर तब्बल 99 उमेदवार रिंगणात