मुंबई :फोन टॅपिंगप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची अखेर बदली करण्यात आलीय. त्यानंतर आता राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप रंगू लागलेत. नाना पटोलेंनी रश्मी शुक्ला या भाजपासाठी काम करत असल्याचं म्हटलं होतं. त्यावर आक्षेप घेत भाजप नेते आशिष शेलार त्यांना 7 दिवसांत पुरावे सादर करण्याची नोटीस पाठवणार आहेत. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी ते बोलत होते.
पटोलेंची तक्रार निवडणूक आयोगाकडे करणार : काँग्रेसनं भाजपावर बेछुट आरोप करण्याआधी त्याचे पुरावे द्यावे लागतील. किंबहुना आज ते आरोप त्यांनी केले असतील आणि त्यांच्याकडे पुरावे नसतील, तर आज मी घोषित करतोय की नाना पटोलेंची तक्रार निवडणूक आयोगाकडे करणार आहे. खरं तर हा भाजपाच्या बदनामीचा प्रयत्न आहे. रश्मी शुक्ला त्यांची बाजू मांडतील, पण देवेंद्र फडणवीसांचं नाव यांनी विनाआरोप घेतलं असेल तर त्यांनी फोन टॅपिंगचे पुरावे द्यावेत अन्यथा त्यांना 7 दिवसांत नोटीस पाठवणार आहोत. नाना पटोलेंनी विनापुरावे बेछूट आरोप केल्याबद्दल त्यांच्यावर निवडणूक आयोगानं कारवाई करावी ही मागणी आम्ही करू, असंही आशिष शेलार म्हणालेत. शुक्ला यांनी विरोधकांचे फोन टॅप केल्याचे पुरावे नाना पटोले यांनी सात दिवसात सादर करावेत, अशी नोटीस नाना पटोले यांना पाठवणार असल्याचं शेलार म्हणालेत. नाहीतर नाना पटोले यांच्यावर बेछूट, बिनबुडाचे, विना पुरावे आरोप करून बदनामी केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचंही शेलार यांनी सांगितलंय.
निवडणूक आयोग निःपक्षपातीपणे काम करते- शेलार : पुढे ते म्हणाले की, काँग्रेसच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांची बदली केली असेल तर निवडणूक आयोग हे निःपक्षपातीपणे काम करीत आहे हे काँग्रेसवाले मानायला तयार झालेत. परंतु उद्या त्याच निवडणूक आयोगाचा एखादा निर्णय यांच्या विरोधात गेला तर त्यांनी त्याबाबत आगडोंब करू नये. नाहीतर पुन्हा निवडणूक आयोग एकतर्फी निर्णय घेतो. निःपक्षपातीपणे काम करत नाहीत, अशी दुहेरी टुमटुमी हे काँग्रेसवाले वाजवतील, असा टोलाही आशिष शेलारांनी दिलाय.