मुंबई -विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगलं यश मिळालंय. यानंतर रविवारी (15 डिसेंबर) रोजी मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथविधी झाला. मात्र महायुतीतील तिन्ही पक्षातील अनेक आमदार हे मंत्रिपदासाठी इच्छुक होते. मंत्रिपदासाठी ते गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते. मात्र अनेकांना मंत्रिपद न मिळाल्यामुळं ते नाराज झालेत. दरम्यान, शिवसेना (शिंदे गटातील) नेते विजय शिवतारे आणि प्रकाश सुर्वे यांनी आपण मंत्रिपदासाठी इच्छुक होतो. मात्र मंत्रिपद न दिल्यामुळं आपण नाराज असल्याचं त्यांनी बोलून दाखवलंय. यानंतर आता जरी मंत्रिपद दिलं तर मी घेणार नाही, अशी भूमिका विजय शिवतारे यांनी घेतली होती. मात्र आज या दोघांनीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतलीय. आमचे आमदार जास्त निवडून आलेत, आम्हाला स्पष्ट बहुमत मिळालंय. त्यामुळं जागा जास्त आणि मंत्रिपद कमी आहेत. मात्र ज्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नाही, त्यांना पक्ष संघटनेची जबाबदार देणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलंय. आज त्यांची विजय शिवतारे आणि प्रकाश सुर्वे यांनी भेट घेतल्यानंतर शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
पदं येतात आणि जातात :पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, मंत्रिपद मिळाले नाही म्हणून विजय शिवतारे आणि प्रकाश सुर्वे नाराज होते. शेवटी प्रत्येकाला मंत्रिपद मिळावे ही भावना असते. कार्यकर्त्यांचीही भावना असते. भावना बाळगणे काही चुकीचे नाही. जास्त जागा निवडून आल्यामुळं संयम ठेवावा लागेल. पद हे कायम येतं आणि जातं. मला काय मिळालं यापेक्षा मी महाराष्ट्राला काय दिलं हे अधिक महत्त्वाचं आहे. लाडक्या बहिणींनी लाडक्या भावाला बाजूला ठेवलं. गेल्या अडीच वर्षांत आम्ही अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. अनेक लोक कल्याणकारी योजना आणल्या. त्याची पोचपावती म्हणून पुन्हा लोकांनी आम्हाला निवडून दिलंय. मंत्रिपदासाठी श्रद्धा आणि सबुरी ठेवावी लागते. ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही, त्यांना पक्ष संघटनेची जबाबदारी देण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत.
माणुसकीला काळिमा फासणारी घटना : बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. बीडमधील माणुसकीला काळिमा फासणारी क्रूर घटना आहे. या घटनेचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. घटनेची गंभीर दखल आम्ही घेतलेली आहे आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. न्यायालयीन चौकशी, एसआयटीची चौकशी नेमण्यात आलीय. आरोपी कितीही मोठा असला किंवा त्याचे कोणासोबतदेखील संबंध असले तरी त्यांच्यावर कारवाई होणारच आहे. कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, असंही शिंदे म्हणालेत.
कडक कारवाई होणारच : कल्याणमध्ये एका मराठी माणसावर हल्ला करण्यात आलाय. या घटनेवर सभागृहात मुख्यमंत्र्यांनी सविस्तर निवेदन दिलंय. संबंधित दोषी व्यक्तीवर कारवाई करण्यात आलेली आहे. मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी आणि अस्मितेसाठी शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरेंनी केली होती. मराठी माणसावर अन्याय होणार नाही, यासाठी सरकार गंभीर आहे. मराठी माणसाला कोणी चुकीची वागणूक देत असेल तर ते चुकीचं आहे, असंही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
आमची जबाबदारी आणखीन वाढली :आम्ही गेल्या महायुतीच्या सरकारमध्ये लाडका भाऊ, लाडका शेतकरी यांच्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेत. म्हणून त्यांनी आम्हाला पुन्हा निवडून दिलंय. आम्हाला निवडून दिल्यामुळं आता आमची जबाबदारी आणखीन वाढलीय. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचे काम आमच्या सरकारने केलंय. या आधी अनेक सरकार आली आणि गेली पण त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे काम का केलं नाही? असा सवाल उपमुख्यमंत्री शिंदेंनी उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न केले. मोदी सरकारने आणि आमच्या राज्य सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलाय, असं शिंदे म्हणालेत.
ज्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नाही, त्यांना पक्षामध्येच जबाबदारी देणार - एकनाथ शिंदे - MAHARASHTRA CABINET EXPANSION
ज्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नाही, त्यांना पक्ष संघटनेची जबाबदार देणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलंय. आज शिवतारे आणि सुर्वेंनी भेट घेतल्यानंतर शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला.
एकनाथ शिंदे (Source- ETV Bharat)
Published : Dec 20, 2024, 5:50 PM IST