मुंबई :ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 2023 सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला. गेल्या पाच दशकांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या कलाकाराचा राज्याचा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलाय. मुख्यमंत्री कार्यालयातून याची घोषणा करण्यात आली. यानंतर अशोक सराफ यांच्यावर सातत्यानं अभिनंदनाचा वर्षाव होतोय.
मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलं : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्याचं अभिनंदन केलं. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचं दर्शन आपल्या अभिनयातून घडविलं आणि रसिकांवर अधिराज्य गाजवलं, असं मुख्यमंत्र्यांनी त्यांचं अभिनंदन करतांना म्हटलं.
अजित पवारांची पोस्ट : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत अशोक मामांचं अभिनंदन केलंय. हा कलाक्षेत्रातील प्रदीर्घ दैदिप्यमान कारकिर्दीचा, मराठीतील सुपरस्टार अभिनेत्याचा आणि महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाचा गौरव असल्याचं ते म्हणाले. अशोक सराफांनी आपल्या सहजसुंदर अभिनयानं आणि विनोदी भूमिकांनी रसिकांना मनमुराद हसवलं. त्यांनी मराठीसह हिंदी कलाक्षेत्र समृद्ध केलं, असं अजित पवार म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अशोक सराफ यांचं अभिनंदन केलंय. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांना जाहीर होतोय, ही अतिशय आनंदाची बाब असल्याचं फडणवीस म्हणाले. सर्व प्रकारच्या भूमिका साकारणाऱ्या अशोक सराफ यांनी मराठीचा झेंडा हिंदी चित्रपट सृष्टीतही फडकवला, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडवीसांनी दिली.
जितेंद्र आव्हाडांच्या अनोख्या शब्दांत शुभेच्छा : आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अशोक सराफांना अनोख्या शब्दांत शुभेच्छा दिल्या. आमचं तारुण्य आणि त्याच्या आठवणी चिरतरुण ठेवणाऱ्या या "अफलातून" नायकास हा पुरस्कार देताना या सरकारने कोणतीही "बनवाबनवी" केली नाही, याचा आनंदच आहे. आता मोठ्या "धूमधडाक्यात" त्यांना हा पुरस्कार प्रदान व्हावा, असं आव्हाडांनी लिहिलं.
रोहित पवारांनी केलं अभिनंदन : आमदार रोहित पवार यांनी 'X' वर पोस्ट करत अशोक सराफांचं अभिनंदन केलंय. रसिकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या या ज्येष्ठ अभिनेत्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मनापासून अभिनंदन, असं रोहित पवार म्हणाले.
हे वाचलंत का :
- ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर; कलेची अविरत सेवा सुरुच राहणार, 'ईटीव्ही'ला Exclusive प्रतिक्रिया