मुंबई : महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदा राज्य विधानसभेच्या निवडणुका १९६२ साली झाल्या. त्यावेळपासून आजपर्यंतचा राज्यातील प्रमुख पक्षांच्या विधानसभा निवडणुकीतील कामगिरीचा इतिहास पाहणे यावेळच्या निवडणुकीच्या निमित्तानं रंजक ठरणार आहे.
सन १९६२ सालापासून प्रामुख्यानं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजेच काँग्रेस पक्षाबरोबरच शिवसेना तसंच सुरुवातीला जनसंघ त्यानंतर जनता पार्टी म्हणजेच आताचा भाजपा पक्षासह अलिकडच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस तसंच मनसेची राज्यातील कामगिरी नेमकी कशी होती हे पाहूयात.
निवडणूक माहितीचा तक्ता (ECE site, ETV Bharat GfX) यामध्ये सुरुवातीला जनसंघ, जनता पार्टी आणि सध्याची भारतीय जनता पार्टीचा उल्लेख आपण सुरुवातीपासूनच भारतीय जनता पार्टी असा केलेला आहे. यामध्ये सुरुवातीला १९७७ सालापर्यंत जनसंघ म्हणून तर १९७७ ते १९८० सालापर्यंत जनता पार्टी म्हणून त्यानंतर १९८१ पासून भारतीय जनता पार्टी या नावानं पक्षाची स्थापना झाल्यापासून भाजपा या नावाखालीच आजपर्यंत निवडणुका लढवल्या गेल्या आहेत.
१९६२ विधानसभा निवडणूक - आता राज्यातील १९६२ सालच्या पहिल्या विधानसभेच्या निवडणुकीचा विचार केल्यास, काँग्रेसनं सर्व २६४ जागा लढवल्या होत्या. त्यामध्ये २१५ जागांवर त्यांना विजय मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना तसंच मनसे त्यावेळी अस्तित्वाच नव्हती. त्यावेळचा जनसंघ म्हणजेच आजच्या भाजपा पक्षानं १२७ जागा लढवल्या. मात्र त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही. तर इतर पक्षांनी राहिलेल्या जागा जिंकल्या.
१९६७ विधानसभा निवडणूक -त्यानंतर १९६७ साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसनं २७० जागा लढवल्या. त्यांचे २०३ उमेदवार निवडून आले. जनसंघानं १६६ जागा लढवल्या, त्यात त्यांचे ४ उमेदवार निवडून आले.
१९७२ विधानसभा निवडणूक - पुढील निवडणुकीत म्हणजेच १९७२ साली काँग्रेसनं २७१ जागा लढवल्या. त्यात त्यांना २२२ जागी विजय मिळाला. जनसंघानं १२२ जागा लढवल्या तर त्यांना फक्त ५ जागा जिंकता आल्या. त्यावेळी शिवसेना नवीनच होती. त्यांनी २६ जागेवर उमेदवार उभे केले होते. त्यांचा एका जागेवर विजय झाला.
१९७८ विधानसभा निवडणूक -त्यानंतर १९७८ साली राज्य विधानसभेची निवडणूक झाली. यावेळी काँग्रेसनं २०३ जागी उमेदवार उभे केले होते. त्यापैकी त्यांना ६२ जागा मिळाल्या. शिवसेनेनं ३५ जागा लढवल्या होत्या. मात्र त्यांना एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही.
१९८० विधानसभा निवडणूक - १९७८ च्या निवडणुकीनंतर इंदिरा गांधी यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पुलोद चं राज्य सरकार बरखास्त करुन राज्यात १९८० साली राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्रात त्याच वर्षी म्हणजे १९८० साली निवडणुका झाल्या. त्यावेळी काँग्रेसनं २८६ जागा लढवल्या. तर त्यांना १८६ जागी विजय मिळाला. जनता पार्टीनं १४५ जागा लढवल्या, त्यांना १४ जागी विजय मिळाला. बाकी इतर पक्षांचे उमेदवार निवडून आले.
१९८५ विधानसभा निवडणूक- महाराष्ट्रात त्यानंतर १९८५ साली विधानसभा निवडणूक झाली. त्यावेळी काँग्रेसनं २८७ जागांवर निवडणूक लढवली. त्यामध्ये १६१ जागी काँग्रेसला विजय मिळाला होता. या निवडणुकीत पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टी या नावावर भाजपा पक्षानं निवडणूक लढवली. त्यामध्ये ६७ जागी त्यांनी लढत दिली. त्यावेळी भाजपाचा १६ जागांवर विजय झाला होता.
१९९० विधानसभा निवडणूक - पुढील निवडणुकीत १९९० साली काँग्रेसनं २७६ जागांवर लढत दिली. त्यामध्ये ते १४१ जागांवर विजयी झाले. भाजपानं १०४ जागी निवडणूक लढवली. त्यांनी तब्बल ४२ जागांवर विजय मिळवला. शिवसेना १८३ जागावर लढली. त्यांनी ५२ जागांवर विजय संपादन केला.
१९९५ विधानसभा निवडणूक - पुढे १९९५ साली काँग्रेसनं २८६ विधानसभा मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले होते. त्यावेळी काँग्रेसचे ८० उमेदवार जिंकून आले. देशातील आणीबाणी राजवटी नंतरची १९७८ सालची निवडणूक वगळता यावेळी पुन्हा एकदा काँग्रेसचे विजयी उमेदवार दोन अंकावर आले होते. भाजपानं ११६ जागी लढत दिली. त्यांचा ६५ जागी विजय झाला. शिवसेनेनं त्यावेळी १६९ जागी लढत दिली होती. त्यांचे ७३ उमेदवार आमदार झाले.
१९९९ विधानसभा निवडणूक - त्यानंतर राज्यात पुढील विधानसभा निवडणूक १९९९ साली झाली. यावेळी काँग्रेसनं २४९ जागा लढवल्या. त्यामध्ये ७५ जागी त्यांना विजय मिळाला. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसनं २२३ जागा लढवल्या. त्यांना ५८ जागांवर विजय मिळाला. तर भाजपानं ११७ जागेवर लढत दिली होती. त्यांना ५६ जागी विजय मिळाला. शिवसेनेनं १६१ जागांवर यावेळी लढत दिली होती. त्यांना ६९ जागी विजय मिळाला.
२००४ विधानसभा निवडणूक - त्यानंतर २००४ साली झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं १५७ जागा लढवल्या होत्या. त्यावेळी त्यांचा ६९ जागी विजय झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसनं १२४ जागांवर निवडणूक लढवली होती. त्यांचा ७१ जागी विजय झाला होता. तर भाजपानं १११ जागी निवडणूक लढवली, त्यांना ५४ जागी विजय मिळाला. शिवसेना १६३ जागा लढली. त्यांना ६२ जागी विजय मिळाला.
२००९ विधानसभा निवडणूक - महाराष्ट्रात २००९ सालच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं १७० जागा लढवल्या. त्यामध्ये त्यांना ८२ जागी विजय मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसनं ११३ जागी निवडणूक लढवली. त्यांचे ६२ उमेदवार जिंकून आले. भाजपा ११९ जागी निवडणूक लढवली होती. त्यांचे ४६ उमेदवार निवडून आले. शिवसेना १६० जागा लढली होती. त्यांचे ४४ उमेदवार निवडून आले. या निवडणुकीत नव्यानं स्थापन झालेल्या राज ठाकरे यांच्या मनसेनं पहिल्यांदाच आपले उमेदवार उतरवले होते. त्यांनी १४३ उमेदवार रिंगणात उतरवले होते, त्यातील १३ जण निवडून आले होते.
२०१४ विधानसभा निवडणूक - त्यानंतर २०१४ साली काँग्रेसनं २८७ जागांवर निवडणूक लढवली. त्यांना ४२ जागांवर समाधान मानावं लागलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसनं २७८ जागी निवडणूक लढवली. त्यांनाही फक्त ४१ जागा मिळाल्या. तर भाजपानं यावेळी २६० जागी निवडणूक लढवली. त्यांना तब्बल १२२ जागी यश आलं. शिवसेनेनं २८२ जागा लढवल्या. त्यांना ६३ जागी यश मिळालं. या निवडणुकीत मनसेचा मात्र सुपडा साफ झाला. त्यांनी तब्बल २१९ जागा लढवल्या. मात्र त्यांचा एकच उमेदवार आमदार झाला होता.
२०१९ विधानसभा निवडणूक -गेल्यावेळी २०१९ सालच्या निवडणुकीत काँग्रेसनं १४७ जागा लढवल्या. त्यांचे ४४ आमदार झाले. राष्ट्रवादीनं १२१ जागा लढवल्या. त्यांना ५४ जागी यश आलं. भाजपानं १६४ जागा लढवल्या. त्यांचे १०५ उमेदवार निवडून आले. तर मनसेनं १०१ उमेदवार उभे केले होते. त्यांना यावेळीही फक्त १ जागेवर समाधान मानावं लागलं. बाकी ठिकाणी इतर पक्षांचे उमेदवार निवडून आले होते.
आता २०२४ साली पुन्हा महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होत आहे. यावेळी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये लढत होत आहे. यामध्ये महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हे प्रमुख पक्ष आहेत. तर महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी हा पक्ष तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वा खालील शिवसेना पक्ष तसंच अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवाती काँग्रेस पक्ष आमने सामने आहेत. दोन प्रमुख पक्षातील फुटीमुळे यावेळी सगळीकडेच रंगतदार लढती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निकालात कुणाचं वर्चस्व राहतं हेही पाहणं रंजक ठरेल.
हेही वाचा...
- 'झिरो टू हिरो'! 1962 साली शून्य जागा जिंकणारा भाजपा आता आहे 'किंगमेकर'
- राज्यातील १०४ आमदार करतात शेती, ५० आमदारांचा व्यवसाय 'समाजकार्य'; A to Z माहिती फक्त एका क्लिकवर
- बंडखोरीच्या धाकानं जागावाटपास विलंब; इच्छुकांसाठी यंदा अनेक पर्याय उपलब्ध