मुंबई Mahavikas Aghadi Press Conference:महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शनिवारी (15 जून) मुंबईत सयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलतान त्यांनी लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेतही निश्चितच परिवर्तन होईल असा दावा केला आहे. मुंबईत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शदरचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तसंच काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते.
राज्यातील जनतेचे आभार :पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले. 'देशातील जनता आता जागी झाली आहे. त्यांना खरेपणा, खोटेपणा यातला फरक समजतोय. राज्यातील जनतेनं अत्यंत विश्वासानं महाविकास आघाडीला मतदान केलंय. हे मतदान लोकशाही वाचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी आहे. आम्ही या मतांसह जनतेचा आदर करतो', असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. मात्र, ही लढाई अंतिम नाही, आता विधानसभा आमचं लक्ष आहे. विधानसभा निवडणूक आम्ही तिन्ही पक्ष तसंच आमचे घटक पक्ष एकत्र मिळून लढवणार आहोत, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. मराठी माणसांनी आम्हाला मतदान केलंच मात्र, सर्व धर्मीयांनी आम्हाला मतदान केलं आहे. त्यामुळं सर्व धर्मीय जनतेचे आम्ही आभारी आहोत, असं ते म्हणाले.
'त्यांना' परत घेणार नाही : भाजपानं या निवडणुकीत अनेक नरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी निवडणूक प्रचारात जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण, जनता त्याला बळी पडली नाही. शिवसेना पक्ष सोडून गेलेल्या गद्दारांना परत घेणार नाही. तसंच अमोल कीर्तिकर यांच्या मतदार संघात निवडणुकीत झालेल्या गैरप्रकाराबाबत याचिका दाखल केली आहे. महिनाभरात त्याचा निर्णय अपेक्षित आहे, असं ठाकरे म्हणाले.