मुंबई -मुंबईतील विधानसभा मतदारसंघ हा अतिशय चर्चेतला विधानसभा मतदारसंघ आहे. कारण येथे तिरंगी लढत होणार आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे यांच्याविरोधात शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा तर मनसेकडून संदीप देशपांडे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे येथे तिरंगी लढत होणार असून, चुरशीचा सामना होऊ शकतो. त्यामुळे विजयी कोण होणार? वरळीकर कोणाच्या बाजूने कौल देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना मागील आमदारकीच्या काळात मी अनेक वरळीत काम केलीत. त्यामुळे यावेळी नक्कीच माझ्यावरती विश्वास टाकून माझ्या बाजूने कौल देतील, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी "ईटीव्ही भारत"ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितलंय.
कौटुंबिक निवडणूक नाही :माहीम मतदारसंघातून तुमचे बंधू अमित ठाकरे निवडणूक लढवत आहेत, तर दुसरीकडे वरुण सरदेसाई हे वांद्र्यातून निवडणूक लढवत आहेत, यांना शुभेच्छा काय द्याल, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांना विचारला असता ते म्हणाले, हे बघा ही आमची निवडणूक म्हणून आम्ही लढवतोय. त्यामध्ये कोणतेही कौटुंबिक नातं आणत नाही. आम्ही जनतेसाठी निवडणुकीला सामोरे जातोय. त्यामुळे नक्कीच राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे सरकार येईल, असे आदित्य ठाकरे म्हणालेत. तसेच शिवसेना फुटीनंतर ही पहिली निवडणूक असली तरी मतांचे विभाजन कुठेही होणार नाही, त्याची काही भीती वाटत नसल्याचं आदित्य ठाकरे म्हणालेत.