मुंबई-राज्यात विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान पार पडले असून, आता मतमोजणीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलंय. महायुती आणि महाविकास आघाडीला दोन्ही बाजूला त्यांचीच सत्ता येईल, अशी अशा असतानाच आता एक्झिट पोलही समोर आलेत. 'मॅट्रिझ' एक्झिट पोलने महायुतीला 150-170 जागा आणि महाविकास आघाडीला 110-130 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवलाय. तर इतर अपक्षांना 8-10 जागा मिळू शकतात, अशी शक्यता आहे. त्यामुळं महायुतीला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचं एक्झिट पोलनुसार स्पष्ट होतंय.
महायुतीला 160 हून अधिक जागा मिळतील :विशेष म्हणजे महाराष्ट्रातील एक्झिट पोलच्या अंदाजांवर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिलीय. दीपक केसरकर हे शिंदेंच्या मंत्रिमंडळातही राज्यमंत्री आहेत. माझ्या अंदाजानुसार महायुतीला 160 हून अधिक जागा मिळतील. त्यामुळे आम्ही आधी सरकार कसे बनवू शकतो हे पाहणार आहोत. गरज पडल्यास आम्ही 10 ते 15 अपक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन करू शकतो, असंही दीपक केसरकर यांनी सांगितलंय.