मुंबई Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभा निवडणुकांच्या पाठोपाठ राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचं रणशिंग फुंकलं असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी महायुतीला फटका बसल्यानं राज्यात महायुतीच्या वतीनं विविध घोषणांची खैरात सुरू आहे. सर्व स्तरातील मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीनं केला जात आहे. "लोकसभा निवडणुकांचा परिणाम विधानसभा निवडणुकांवर होऊ नये, म्हणून या निवडणुका थोड्या लांबवण्यावर सरकारचा भर आहे. त्यामुळे दिवाळीनंतर विधानसभा निवडणुका घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे," असं राजकीय विश्लेषक दिलीप सपाटे यांनी सांगितलं.
केव्हा संपते विधानसभेची मुदत? :हरियाणा आणि महाराष्ट्र या दोन राज्यांची विधानसभांची मुदत जवळपास सारख्याच कालावधीत संपत असल्यानं या दोन्ही राज्यांची निवडणूक एकत्र घोषित केली जाते. हरियाणा राज्याची विधानसभेची मुदत तीन नोव्हेंबरला संपत आहे, तर महाराष्ट्र विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर 2024 ला संपुष्टात येणार आहे. या दोन्ही राज्यांच्या मुदत संपण्याच्या कालावधीत 23 दिवसांचं अंतर आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग हरियाणा राज्याच्या मुदतपूर्व निवडणुका घोषित करण्याची शक्यता आहे. नियमाप्रमाणं कोणत्याही विधानसभेचा मुदतीचा कालावधी संपण्यापूर्वी किंवा कालावधी संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सरकार अस्तित्वात येणं आवश्यक आहे. त्यानुसार विचार करता निवडणुका ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात घेतल्या जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.