भाजपाचे राम कदम चौथ्यांदा गड राखणार? घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघात कोण मारणार बाजी? - GHATKOPER WEST CONSTITUENCY
भाजपाचे राम कदम हे तीन वेळा घाटकोपर पश्चिम आमदार म्हणून निवडून येत विजयाची हॅट्रिक साजरी केलीय. ते चौथ्यांदा गड राखणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय.
महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (ETV Bharat File Photo)
मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, याचा निकाल 23 नोव्हेंबरला लागणार आहे. त्यामुळं आता प्रचाराला खऱ्या अर्थाने रंग चढला असून, प्रचारात सत्ताधारी-विरोधकांच्या तोफा धडाडू लागल्या आहेत. दरम्यान, ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा चर्चेतील आणि महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ मानला जातो. इथे भाजपाचे राम कदम हे तीन वेळा आमदार म्हणून निवडून येत विजयाची हॅट्रिक साजरी केलीय. ते चौथ्यांदा गड राखणार की? घाटकोपरवासीय येथे बदल घडवणार? याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय. घाटकोपरमध्ये संमिश्र समाजातील अन् बहुभाषिक लोकवस्ती आहे. चांगले रस्ते, वाहतूक कोंडी आणि झोपडपट्टी पुनर्वसन आदी मुद्दे या मतदारसंघात दिसून येतात. घाटकोपर पश्चिम मतदारसंघाचा कसा आहे इतिहास? कोणकोणत्या समस्यांना लोकांना सामोरे जावे लागतेय? आणि येथे पक्षीय बलाबल कसे आहे? याचा आपण आज आढावा घेणार आहोत. तसेच येथे यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय भालेराव, भाजपाचे राम कदम, मनसेचे गणेश चुक्कल आणि वंचितचे सागर गवई यांच्यात चौरंगी लढत होणार आहे. त्यामुळं यात कोण बाजी मारतंय, याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.
कसा आहे मतदारसंघाचा इतिहास? :घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात येतो. मुंबई उपनगरात जिल्ह्यात हा मतदारसंघ येतो. तसेच या मतदारसंघात अनेक महापालिकेतील वॉर्ड येतात. 2008 रोजी या मतदारसंघाची रचना करण्यात आली. यानंतर 2009 विधानसभा निवडणुकीनंतर सलग तीन वेळा राम कदम यांनी विजयी होत हॅट्रिक केलीय. 2009 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून राम कदम हे पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 2014 आणि 2019 या दोन वेळेस भाजपातून आमदार म्हणून निवडून आलेत. 2009 विधानसभा निवडणुकीत मनसेच्या राम कदम यांनी भाजपाच्या पूनम महाजन यांचा मोठ्या मताधिक्कानं पराभव केला होता. 2014 मध्ये राम कदम यांनी मनसेला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केला. भाजपातून 2014 साली पहिल्यांदा निवडणूक लढवत निवडून आले. दरम्यान, या मतदारसंघात जवळपास पावणेतीन लाख मतदार आहेत. यात तब्बल दीड ते पावणेदोन लाख मराठी मतदार आहेत. यात राम कदमांचा एक वेगळा मतदार आहे. कारण राम कदमांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविलेत.
मतदारसंघात काय आहेत समस्या? : घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघात पूर्वी मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या होत्या. परंतु आता झोपडपटी पुनर्वसन झाल्यामुळं आता इथे झोपडपट्टीची जागा गगनचुंबी इमारतींनी घेतली आहे. तर अजूनही अनेक झोपडपट्ट्या पुनर्वसनांच्या प्रतीक्षेत आहेत. त्या झोपडपट्टीत पाणी, वीज तसेच विभागात चांगले रस्ते पाहिजेत, असं मतदारसंघातील मतदारांचं म्हणणे आहे. इथे सायंकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा नागरिकांना सामना करावा लागतो. तसेच इथे भाजपाचे आमदार राम कदम यांनी काही महत्त्वपूर्ण कामं केलीत. मतदारसंघातील नागरिकांसाठी विविध शिबिर, तीर्थ यात्रा घडवणे आदी कामांमुळं राम कदम यांचा एक वैयक्तिक मतदार वर्ग असल्याचं बोललं जातंय. परंतु या मतदारसंघात झोपडपट्टी पुनर्वसनाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. आताच्या निवडणुकीत जो आमदार निवडून येईल, त्याने हा मुद्दा सोडवावा, असंही लोकांचा म्हणणं आहे.
पक्षीय बलाबल कसं आहे? :2008 नंतर या मतदारसंघाची पुनर्रचना झालीय. त्यानंतर तीन वेळा राम कदम आमदार आहेत. 2009 साली मनसेतून ते निवडून आले होते. त्यावेळी त्यांना 60,343 एवढी मतं मिळाली होती. त्यानंतर 2014 मध्ये त्यात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन 80 हजार 343 मते मिळाली होती. तर 2014 नंतर राम कदम हे भाजपात आहेत. 2019 सालीसुद्धा राम कदम यांनी मोठा विजय मिळवला होता. यावेळी त्यांना 70,263 मते मिळाली होती. घाटकोपर पश्चिम हा भाजपाच्या गड मानला जात असून, येथे भाजपाची ताकद आहे. भाजपाच्या तुलनेत शिवसेना आणि मनसेचेही मतदार येथे आहेत. मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात मतांमध्ये विभागणी झालीय. आता महाविकास आघाडी की महायुती बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तरीसुद्धा भाजपाचे राम कदम यांचा इथे विजय मानला जातोय. परंतु यावेळी भाजपाचे राम कदम याचे वर्चस्व असले तरी त्यांच्या विरोधात उबाठा गटाचे संजय भालेराव, तसेच मनसेचे गणेश चुक्कल आणि वंचितचे सागर गवई यांच्यात चौरंगी लढत होणार आहे. त्यामुळं यामध्ये कोण बाजी मारतंय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.