मुंबई - विधानसभा निवडणूक मतदानाला अवघे सहा दिवस बाकी असताना आणि प्रचारासाठी चार दिवस शिल्लक असताना राजकीय नेत्यांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. विविध राजकीय पक्षाचे नेते प्रचारासाठी राज्यभर दौरा करताना दिसत आहेत. या दौऱ्यात नेत्यांच्या बॅग तपासण्यात येत आहेत. हेलिपॅडवरती हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर निवडणूक अधिकारी अनेक नेत्यांच्या बॅग तपासताना दिसताहेत. पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांची यवतमाळमधील वणी येथे बॅग तपासण्यात आली होती. यानंतर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. "फक्त माझी एकट्याचीच बॅग तपासू नका, तर मोदी-शाह, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्याही बॅग तपासा आणि तो व्हिडीओ मला पाठवा", असं उद्धव ठाकरेंनी निवडणूक अधिकाऱ्यांना खडसावले होते. यानंतर अनेक नेत्यांच्या बॅगा तपासण्यात येत आहेत. दरम्यान, आज तिसऱ्यांदा उद्धव ठाकरेंची श्रीगोंदा येथे बॅग तपासण्यात आलीय.
तिसऱ्यांदा बॅग तपासली :उद्धव ठाकरे हे यवतमाळ येथे प्रचार सभेला जात असताना वणीतील हेलीपॅडवरती हेलिकॉप्टरमधून उतरताच निवडणूक अधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंची बॅग तपासली होती. यावेळी माझी एकट्याचीच बॅग न चेक करता सर्वांच्याच बॅगा तपासा, न्याय सगळ्यांना सारखा असतो, असं म्हणत उद्धव ठाकरे हे निवडणूक अधिकाऱ्यांवर चांगलेत संतापले होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी स्वत: व्हिडीओ शूट केला होता. दरम्यान, यवतमाळ येथे पहिल्यांदा उद्धव ठाकरेंची बॅग तपासल्यानंतर आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची श्रीगोंदा येथे तिसऱ्यांदा बॅग तपासण्यात आलीय. यावेळी स्वतः उद्धव ठाकरेंनी व्हिडीओ शूट करत निवडणूक अधिकाऱ्यांची चौकशी केली. तुमचे नाव काय? कुठून आलात? कधीपासून काम करताय? अशी चौकशी केलीय. तसेच याआधी कुणा-कुणाच्या बॅगांची तपासणी केली आहे का? असे सवाल उद्धव ठाकरेंनी निवडणूक अधिकाऱ्यांना विचारलेत.