मुंबई -विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेसमधील पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी या पराभवाची जबाबदारी स्वीकारावी आणि राजीनामा द्यावे, अशी मागणी पक्षातून केली जातेय. काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून या पराभवाचे चिंतन केले जाण्याची आणि महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेसचे प्रभारी यांची कामगिरी तपासून त्यांच्यावर कारवाई करण्याची शक्यता वर्तवली जातेय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी राजीनामा दिल्याची चर्चा सोमवारी सकाळी सुरू झाली, मात्र प्रदेश काँग्रेसकडून त्याचा इन्कार करण्यात आलाय. नाना पटोले यांना दिल्लीत बोलावले असून, त्यांची बाजू ऐकल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाण्याची माहिती देण्यात येतेय.
काँग्रेस पक्षात झाडाझडती होण्याची शक्यता:विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस पक्षात झाडाझडती होण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षाला या निवडणुकीत संपूर्ण राज्यभरात अवघ्या 16 जागांवर विजय मिळवता आलाय. काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जाणारे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पराभव स्वीकारावा लागला. महाविकास आघाडीची सत्ता आल्यास मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक असलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अवघ्या 208 मतांनी विजय मिळालाय. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात पराभवाची जबाबदारी निश्चित करावी आणि त्यासाठी जबाबदार असलेल्या नेत्यांना राजीनामा देण्यास सांगावे, अशी मागणी पक्षातून पुढे येतंय. विधानसभा निवडणुकीतील या अनपेक्षित आणि दारुण पराभवानंतर काँग्रेस नेतृत्वाकडून राज्यातील नेतृत्व मुंबईतील नेतृत्व बदलाबाबत कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी पुढे येतेय.
निर्णय प्रक्रियेत सर्वांना सामावून घेतले नसल्याचा आक्षेप:पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत आणि प्रचारामध्ये ज्येष्ठ नेत्यांना पुरेशा प्रमाणात सामावून घेतले नसल्याची खंत मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष, आमदार भाई जगताप यांनी व्यक्त केलीय. काँग्रेसच्या परंपरागत गड समजला जाणाऱ्या वर्सोवा, भायखळा या जागांसाठी आग्रह न करता या जागा मित्र पक्षांसाठी सोडण्यात आल्यात. मुंबईत नगण्य जागांवर पक्षाने उमेदवार उभे केलेत. लोकसभेत पक्षाला मिळालेल्या यशामुळे स्थानिक नेतृत्वाने आपल्या मर्जीतील उमेदवारांसाठी प्रयत्न केले. मुंबई अध्यक्ष म्हणून संपूर्ण मुंबईतील प्रचारात सहभाग असल्याचे चित्र दिसून आले नाही, अशी टीका भाई जगताप यांनी केलीय.