मुंबई - विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाबाबत ईव्हीएमवर बोट दाखवत विरोधकांनी आज विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेण्यावर बहिष्कार घातलाय. आज शपथविधीच्या पहिल्या दिवशी 173 सदस्यांनी आमदारकीची शपथ घेतलीय, तर विरोधकांनी यावर पूर्ण बहिष्कार घातलाय. यावरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर सडकून टीका केलीय. विरोधकांचं असं कृत्य म्हणजे विरोधकांना निवडून दिलेल्या जनतेचा हा अपमान असल्याचं मत भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलंय.
जनतेच्या मनात विरोधकांची प्रतिमा मलिन :प्रवीण दरेकर म्हणालेत की, हा केवळ संविधानाचा, लोकशाहीचा, विधिमंडळाचा अपमान नव्हे, तर ज्या लाखोच्या संख्येने मायबाप जनतेने तुम्हाला विधिमंडळात पाठवले, त्या जनतेचा, मतदारांचा अपमान आहे. आज या आमदारांनी त्यांना निवडून आणण्यासाठी ज्या मतदारांनी मतदान करून यांना विधिमंडळात पाठवले, त्या जनतेचा अपमान केलाय. यांना रस्त्यावर बसून नौटंकी करण्यासाठी जनतेने विधिमंडळात पाठवले नाही. म्हणून त्यांच्या मतदारसंघातील मतदारांचा अपमान करण्याचे काम या आमदारांनी केलं असून, मतदारांच्या मनात यांची प्रतिमा मलिन झालीय, असंही दरेकरांनी अधोरेखित केलंय.
विरोधकांना अस्तित्व वाचवायचं असेल तर... :विरोधी पक्ष आज दिसत नाहीये. जनतेने विरोधी पक्ष निवडून येईल इतकं जनमतही यांना दिलं नाही. राजकारणामध्ये जय-पराजय होत असतात. ते मोठ्या मनाने स्वीकारायचे असतात. परंतु यांना अजून दिशा सापडत नाही म्हणून बुडत्याचा पाय खोलात अशा पद्धतीची त्यांची अवस्था झालीय. विरोधकांनी याबाबत आत्मपरीक्षण केलं पाहिजे. विरोधी पक्षनेता बनेल इतकंसुद्धा जनमत त्यांना मिळालेलं नाही, त्यामुळे याचं आत्मपरीक्षण करून त्यामध्ये दुरुस्ती करून लोकांच्या प्रश्नावर ठामपणे उभं राहण्याची आवश्यकता आहे. परंतु तसं न करता शपथविधीवर बहिष्कार घालणे, रस्त्यावर नौटंकी करणे यामध्ये ते धन्यता मानत आहेत. परंतु लोकांना नौटंकी आवडत नाही, म्हणून त्यांनी जो काही निकाल द्यायचा आहे तो दिलाय. आता विरोधकांना आपलं अस्तित्व वाचवायचं असेल तर त्यांनी लोकांच्या प्रश्नासाठी अभ्यास करायला हवा. सरकारला धारेवर धरलं पाहिजे. नाहीतर लोक राहिलेले अस्तित्वसुद्धा संपून टाकायला मागे पुढे पाहणार नाहीत, असंही भाजपा नेते प्रवीण दरेकर म्हणालेत.
प्रवीण दरेकर (Source- ETV Bharat) अजित पवारांच्या मागे राजकारण :उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत दिल्ली लवादाने दिलेला निर्णय आणि शपथविधी हा एक योगायोग आहे. परंतु विरोधकांकडे आता कुठलाच मुद्दा नसल्याने याचं राजकारण करण्याचे काम केलं जात असल्याचंही प्रवीण दरेकर म्हणालेत.
हेही वाचा
- महाविकास आघाडीला धक्का; अबू आझमी मविआमधून बाहेर? विरोधकांना न जुमानता घेतली शपथ
- "मारकडवाडी नव्या भारताच्या इतिहासातील आधुनिक दांडी मार्च"; जितेंद्र आव्हाडांचं विधान