मुंबई-सायन-कोळीवाडा विधानसभा मतदारसंघ मुंबईतील महत्त्वाचा मतदारसंघ असून, सध्या या जागेवर भाजपाची मजबूत पकड आहे. तसेच दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा तो भाग आहे अन् बऱ्याच काळापासून तो राजकीय पक्षांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलाय. 2009 पासून आतापर्यंत या मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) आणि भारतीय जनता पक्ष (BJP) यांच्यात चुरशीची लढत झालीय. भाजपाच्या तमील सेल्वन यांची या मतदारसंघावर मजबूत पकड आहे, पण काँग्रेसही येथे पुनरागमन करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. मतदारसंघाच्या भौगोलिक स्थानाबद्दल बोलायचे झाल्यास ते मुंबई शहर जिल्ह्यात स्थित आहे.
रवी राजा यांचाही सायन-कोळीवाड्यात दबदबा: खरं तर संपूर्ण महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका होत आहेत. राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून, 23 नोव्हेंबरला मतमोजणीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीत सायन-कोळीवाडा मतदारसंघातून भाजपाचे कॅप्टन आर. तमील सेल्वन हे तगडे उमेदवार आहेत आणि काँग्रेसला त्यांना आव्हान देणे कठीण जाऊ शकतं. तसेच 40 वर्षांहून अधिक काळ काँग्रेसमध्ये असलेले मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी काँग्रेसचा हात सोडत कमळ हाती घेतलंय. रवी राजा यांचाही सायन-कोळीवाड्यात दबदबा आहे, त्याचा फायदा आता तमील सेल्वन यांना होणार आहे. सायन-कोळीवाडा विधानसभेत अनुसूचित जातीच्या मतदारांची संख्या अंदाजे 14,858 च्या जवळपास आहे. तसेच अनुसूचित जमातीच्या मतदारांची संख्या अंदाजे 2,481 च्या घरात आहे. विधानसभेतील मुस्लिम मतदारांवर नजर टाकल्यास त्यांची संख्या अंदाजे 53,958 आहे, जी मतदार यादीच्या विश्लेषणानुसार केवळ 21.1 टक्के एवढी आहे. तसेच इथल्या शहरी मतदारांची संख्या अंदाजे 2,55,726 च्या आसपास आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकांच्या आकडेवारीनुसार, सायन-कोळीवाडा विधानसभेत एकूण 2,55,726 मतदार आहेत. या विधानसभेतील मतदान केंद्रांची संख्या 264 आहे. वर्ष 2019 विधानसभा निवडणुकीत सायन-कोळीवाडा विधानसभेची एकूण मतदानाची टक्केवारी 50.78 टक्क्यांच्या घरात होती.
राजकीय इतिहास काय?-2009 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे जगन्नाथ शेट्टी यांनी ही जागा जिंकली होती. त्यावेळी मतदारसंघात काँग्रेस पक्षाचा प्रभाव मोठा होता. पण 2014 च्या निवडणुकीत भाजपाने येथे आपली पकड मजबूत केली, तेव्हा कॅप्टन आर. तमील सेल्वन यांनी काँग्रेसचा पराभव करून विजय मिळवला. तमील सेल्वन यांच्या विजयाने सायन-कोळीवाड्यात भाजपाचे अस्तित्व आणखी मजबूत झालंय. 2019 च्या निवडणुकीत कॅप्टन आर. तमील सेल्वन यांनी काँग्रेसचे उमेदवार गणेश कुमार यादव यांचा 54,845 मतांनी पराभव करत विजय मिळवला होता. काँग्रेसचे गणेशकुमार यादव हे 40,894 मतांसह दुसऱ्या स्थानावर होते. यावरून भाजपा या मतदारसंघावर सातत्याने आपली पकड मजबूत करीत असल्याचे स्पष्ट होत असून, इथे काँग्रेसचं आव्हानही वाढतंय.