मुंबई : पुण्यातील पोर्शे कार अपघातप्रकरणी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना कायदेशीर नोटीस पाठवल्यानं तो चर्चेचा विषय ठरत आहे. परंतु राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरेंनी यू-टर्न घेत शरद पवारांना आपण नोटीस पाठवली नसल्याचं सांगितलंय. त्यानंतर आता सुप्रिया सुळेंनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत थेट त्या नोटिशीची प्रतच प्रसारमाध्यमांना दाखवली. खरं तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे या तिघांनाही नोटीस पाठवण्यात आलीय. 15 ऑक्टोबरला ही नोटीस पाठवण्यात आली होती. सुळे यांनी प्रचार सभेत याचा उल्लेख केल्यावर टिंगरे यांनी अशा प्रकारची नोटीस पाठवण्यात आल्याच्या वृत्ताचा इन्कार केला होता, त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी त्याची प्रतच दाखवली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरेंचा भांडाफोड झाला. नोटिशीत शरद पवारांनी बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी करण्यात आलीय. त्यांनी माफी मागितली नाही तर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलाय, असा उल्लेख नोटिशीमध्ये असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्यात.
दिवाणी आणि फौजदारी खटला चालवण्याची धमकी :खरं तर पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आम्ही टीका केली होती हे संविधानाच्या चौकटी बसत आहे. वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे आणि पोलिसांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीवर आम्ही आरोप केले होते, असे करणे गुन्हा असेल तर आम्हाला हा गुन्हा मान्य आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्यात. त्यांच्यावर टीका केली तर आमच्याविरोधात दिवाणी आणि फौजदारी खटला चालवण्याची धमकी दिलीय. सत्तेतील माणसे असे प्रकार करत असल्याकडे सुप्रिया सुळेंनी लक्ष वेधलं असून, हा सत्तेचा गैरवापर असल्याची टीकाही केलीय.
कायदेशीर कारवाई करण्याचा सुप्रिया सुळेंचा इशारा : दुसरीकडे खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांबाबत केलेल्या वक्तव्याचा त्यांनी निषेध केला. महिलांना धमकी देण्याची हिंमतच कशी होती, असा प्रश्न सुळे यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रातील महिला अशा प्रकारची धमकी खपवून घेणार नाहीत, असे त्यांनी ठणकावले. महाडिक आमच्यासोबत होते, त्यांनी अशा प्रकारे वक्तव्य कसे केले हे कळत नाही, कदाचित त्यांना बदललेल्या सोबतीचा फटका बसला असावा, असा टोलाही सुप्रिया सुळेंनी लगावला. महिला कोणत्याही पक्षाच्या प्रचाराला गेल्यास त्या महिलांविरोधात काहीही कृत्य केले तर त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सुप्रिया सुळेंनी दिलाय. भाजपाचा खरा चेहरा अशा कृत्यामधून समोर आल्याची टीकासुद्धा त्यांनी केलीय. महिला आयोगानेदेखील याची दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.