मुंबईत शिंदे गट अन् ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले, हाणामारीचे कारण काय?
नाशिक तसेच बीडमध्ये दोन पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी आणि राड्याच्या घटना ताज्या असतानाच आता मुंबईतील मालाड येथेही दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते भिडल्याची घटना घडलीय.
Published : 5 hours ago
मुंबई - लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव साजरा केला जात असताना अर्थात विधानसभा निवडणुकीचे मतदान होत असताना राज्यातील बऱ्याच ठिकाणी मतदान केंद्राबाहेर आणि अन्य ठिकाणी हाणामारीच्या आणि बाचाबाचीच्या घटना घडल्यात. नाशिक तसेच बीडमध्ये दोन पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी आणि राड्याच्या घटना ताज्या असतानाच आता मुंबईतील मालाड येथेही दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते भिडल्याची घटना घडलीय. या हाणामारीत पोलिसांनी मध्येच हस्तक्षेप केल्यामुळं पुढील अनर्थ टळलाय.
राड्याचे कारण काय? : मालाड पूर्व येथील पठाणवाडीत उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीनंतर हाणामारीची घटना घडलीय. शिंदे गटाचे उमेदवार संजय निरुपम यांनी ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी मुस्लिम कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा गंभीर आरोप केलाय. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने संजय निरुपम यांनी खुर्ची आणि टेबल रागाने फेकून दिलेय. दरम्यान, ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते काही लोकांना जबरदस्तीने स्वतःच्या पक्षाला मत देण्यासाठी घेऊन जात होते. हा प्रकार आमच्या कार्यकर्त्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता, दोन गटांत बाचाबाची झाली, अशी माहिती संजय निरुपम यांनी दिलीय. यावेळी दोन गटातील कार्यकर्ते भिडले असताना पोलिसांनी मध्येच हस्तक्षेप करून दोन्ही गटांना पांगवले. त्यामुळं पुढे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
राज्यातील विविध भागात राड्याच्या घटना :नाशिकमधील नांदगाव येथे सुहास कांदे आणि समीर भुजबळ एकमेकांसमोर आल्यानं कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी समीर भुजबळ यांना सुहास कांदेंनी तुझी मर्डर करेन, अशी धमकी दिलीय. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यानंतर परळीत शरद पवार गट आणि अजित पवार गटातील कार्यकर्ते एकमेकांत भिडलेत. तर बीडमधील केजमध्ये मतदानाच्या कारणावरून भाजपा कार्यकर्ते आणि शरद पवार गटाचे कार्यकर्ते यांच्यात चांगलाच राडा झालाय. यावेळी पोलिसांना मध्येच हस्तक्षेप करून दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना पांगवले.
हेही वाचा :