मुंबई -विधानसभा निवडणुकीचा निकाल महायुतीच्या बाजूनं लागलाय. त्यामुळं आता स्थापनेच्या हालचालींनी जोर पकडला असून, या धर्तीवर महायुतीकडून बैठकांचं सत्र सुरू आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या पराभवाच्या कारणमीमांसेचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. महायुतीला कौल जनतेनी दिल्यानंतर आम्ही 25 नोव्हेंबर रोजी शपथ घेऊ, असं महायुतीतील नेत्यांकडून सांगण्यात आलं होतं. मात्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कोणाला किती मंत्रिपदं द्यायची, कोणाला कोणती खाते द्यायची, यावर एकमत होत नसल्यामुळं शपथविधी लांबणीवर गेलाय. या आठवड्याच्या शेवटी शपथविधी होणार असल्याचं बोललं जातंय.
राष्ट्रपती राजवटीबाबत लोकांमध्ये संभ्रम :26 नोव्हेंबर रोजी विधानसभेची मुदत संपल्यानंतर राज्यात राष्ट्रवादी राजवट लागते का? किंवा विधानसभेची मदुत संपल्यानंतर पुढे सरकार स्थापन करण्यास किती दिवसाच्या अवधी असतो? विधानसभेची मुदत संपल्यानंतर लगेच सरकार स्थापन न केल्यास राष्ट्रपती राजवट लागू होते का? आणि स्पष्ट बहुमताचा आकडा असल्यास किती दिवसानंतर सरकार स्थापन करता येते? मात्र विलंब झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागते का? असे अनेक प्रश्न जनसामान्यांच्या मनात आहेत. राष्ट्रपती राजवटबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. वरील परिस्थिती उद्भवल्यास राष्ट्रपती राजवट लागेल? किंवा यापूर्वी विधानसेभेची मुदत संपल्यानंतर 10-15 दिवसांनंतरही सरकार स्थापन केलंय का? अशा काही घटना घडल्यात का? यावर घटनातज्ज्ञांनी काय म्हटलंय? पाहू यात...
...तर राष्ट्रपती राजवट लागत नाही :खरं तर निवडणूक निकाल लागल्यानंतर जे राजकीय पक्ष सरकार स्थापन करणार आहेत. त्यांच्याकडे जर बहुमताचा स्पष्ट आकडा असेल आणि तो आकडा त्यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना सुपूर्द केला. तसेच काही दिवसांचा अवधी मागून घेऊन आपण 8-10 दिवसांनी सरकार स्थापन करणार, असे सांगितलं तर विधानसभा निवडणूक मुदत संपल्यानंतरही शपथविधी आणि सरकार स्थापन करता येतंय. मात्र या काळात राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होत नाही, अशी घटना सांगते, अशी प्रतिक्रिया "ईटीव्ही भारत"शी बोलताना घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी दिलीय." पण यादरम्यान काळजीवाहू मुख्यमंत्री राहता येत नाही. दरम्यान, आता जे सरकार येणार आहे, त्यांच्याकडे स्पष्ट बहुमताचा आकडा आहे. त्यामुळं त्यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे आणि सरकार स्थापन करण्यास अवधी मागितला आहे. त्यामुळं राष्ट्रपती राजवट लागू होणार नसल्याचंही घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी म्हटलंय.