मुंबई -विधानसभा निवडणूक मतदानाला सकाळी सात वाजल्यापासून मुंबईसह राज्यात सुरुवात झालीय. मुंबईतील अनेक मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी रांगा पाहायला मिळत आहेत. दरम्यान, मुंबईतील कुलाबा मतदारसंघ हा नेहमी चर्चेत राहिलेला आहे. या ठिकाणी भाजपाचे नेते आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या हिरा देवासी या नार्वेकरांच्या विरोधात निवडणूक लढवताहेत. दरम्यान, राहुल नार्वेकर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मला विजयाची शंभर टक्के हमी असल्याचं सांगितलंय. विरोधकाकडे काही काम नसल्यामुळे ते माझ्यावर टीका करीत आहेत, असा टोला राहुल नार्वेकर यांनी विरोधकांना लगावलाय. मतदान केल्यानंतर त्यांनी 'ईटीव्ही भारत'ला प्रतिक्रिया दिलीय, त्यावेळी ते बोलत होते.
कुछ तो लोग कहेंगे : तुम्ही इथे विद्यमान आमदार आहात. परंतु लोकप्रतिनिधी म्हणून मतदारसंघातील अनेक प्रश्न आणि समस्या या सोडवण्यात अपयशी ठरल्याचं विरोधक बोलतायत, असा प्रश्न राहुल नार्वेकर यांना विचारला असता, हे बघा मी मतदारसंघात बऱ्यापैकी कामं केलेली आहेत. हे जनतेला जाऊन विचारा. सरकारने अनेक विकास कामे केली आहेत आणि मी माझ्या मतदारसंघातील अनेक प्रश्न सोडवलेत. विरोधकांकडे काही काम नसल्यामुळे ते टीका करीत आहेत. कुछ तो लोग कहेंगे...., असं म्हणत राहुल नार्वेकर यांनी विरोधकांना टोला लगावलाय. दरम्यान, मतदारांचा टक्का वाढला पाहिजे. कुलाबा मतदारसंघात प्रत्येक वर्षी मतदान कमी होते. परंतु यावर्षी मतदान वाढेल, असा विश्वास राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केलाय.