अमरावती -विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीचे उमेदवार निवडून येताना दिसत आहेत. राज्यात महायुतीचे सरकार येईल आणि मुख्यमंत्री हा भाजपाचा असेल, असं भाजपा नेत्या आणि अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी म्हटलंय. आमदार रवी राणा आणि नवनीत राणा हे मतदानासाठी घरातून निघाले असताना प्रसार माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी नवनीत राणा यांनी महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केलाय.
रवी राणा नक्कीच निवडून येणार: बडनेरा विधानसभा मतदारसंघात हजारो लाडक्या बहिणींचा आणि मातांचा रवी राणा यांना आशीर्वाद मिळालेला आहे. मतदारसंघात केलेली विकासकामं आणि जनतेसोबत जोडलेली आपुलकीची नाळ पाहता आता रवी राणा हे चौथ्यांदा विजयी होतील, असा विश्वास नवनीत राणांनी व्यक्त केलाय. बडनेरा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे घटक पक्ष असणाऱ्या युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा हे निश्चित विजयी होतील. अमरावती विधानसभा मतदारसंघात यावेळी जगदीश गुप्ता यांची माचीस दिवा पेटवणार, असं नवनीत राणा म्हणाल्यात. बडनेरा मतदारसंघांमध्ये रवी राणा महायुतीचे उमेदवार म्हणून उभे आहेत आणि त्यांना लोकांचं भरपूर प्रेम मिळत आहेत. अनेक वयोवृद्ध महिलांनी आई म्हणून गेल्या 15 वर्षांपासून त्यांच्या डोक्यावर हात ठेवलेला आहे. त्यांना आशीर्वाद दिलेले आहेत. त्यामुळे रवी राणा नक्कीच निवडून येणार आहेत. रवी राणा हे मतदारसंघात अत्यंत सज्जन, शिकलेले- सवरलेले व्यक्ती म्हणून परिचित आहेत, असंही नवनीत राणा म्हणाल्यात.